मुंबई : ‘भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली’, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मेहबूब शेख यांनी बीडच्या शिरुर कासार पोलिस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
“भाजपच्या नेत्या चित्रा वाघ 18 तारखेला शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला बलात्कारी म्हटलं तसंच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी केली”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.
“18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार (जिल्हा परिषद सदस्य बीड) यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर असंख्य कार्यकर्ते हजर होते. चित्रा वाघ यांनी शिरुर येथे येऊन माझी बदनामी व्हावी या उद्देशाने मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचं सांगत, राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही, असं म्हटलं.”
“वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला”, असं मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.
“चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची व्हिडीओ क्लिप काही पत्रकार मित्रांनी मला दाखवली, जी पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली”, असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय.
औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.
मेहबूब शेख हे बीड जिल्ह्यातील शिरुरचे रहिवासी आहेत. साहजिक शिरुरला गेल्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावरती टीका करताना त्यांना बलात्कारी म्हटल्याचं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे. मेहबूब शेख यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
(NCP youth President Maheboob Shaikh complaint against Chitra Wagh in beed shirur Police)
संबंधित बातम्या :
Rape Case | “नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार, आता ‘तो मी नव्हेचं’”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल