पाटणा : जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला (bjp) सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे राज्यातील भाजप-जेडीयू आघाडीच सरकार कोसळलं आहे. आता राज्यात जेडीयू-आरजेडीचं सरकार येणार आहे. नितीश कुमार यांनी भाजपला अचानक धक्का दिला आहे. त्यामुळे नितीश कुमारांचा हा धक्का केवळ सत्तांतरापर्यंतच मर्यादित नाही. तर त्याचा झटका दिल्लीपर्यंत बसणार आहे. नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतल्याने भाजपला राज्यसभेतील (rajyasabha) बहुमत गमवावे लागणार आहे. नितीश कुमार विरोधी गटात आल्याने आता विरोधकांचं राज्यसभेतील बळ वाढलं आहे. त्यामुळे महत्त्वाची विधेयके मंजूर करताना मोदी सरकारला मोठी डोकेदुखी होणार आहे. त्यातून आता मोदी सरकार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे नितीश कुमारामुळे विरोधी गट मजबूत झाला असून आगामी काळात मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितीश कुमार यांनी फारकत घेतल्याने भाजपची बिहारमधील सत्ता गेली आहे. त्यामुळे भाजपला राज्यसभेत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नितीश कुमार यांनी साथ सोडल्याने भाजपला आता राज्यसभेत ओडिशातील बिजू जनता दल, आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस आदी पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. या दोन्ही पक्षांच्या भरवश्यावरच भाजप सरकारला महत्त्वाचे विधेयके मंजूर करता येणार आहेत.
जेडीयू जेव्हा एनडीएचा भाग होता तेव्हा एनडीएला राज्यसभेत बहुमत नव्हतं. राज्यसभेत एकूण 237 सदस्य आहेत. बहुमतासाठी 119 सदस्यांची गरज आहे. जम्मू काशमीरमधून 4, त्रिपुरातून एक आणि राष्ट्रपती नियुक्त तीन सदस्यांची पदे खाली आहे. एका अपक्षासह 5 नामनियुक्त सदस्यांसह एनडीएची सदस्य संख्या 115 आहे. जेडीयू एनडीएतून बाहेर पडल्याने आता एनडीएची सदस्य संख्या 110 झाली आहे. त्यामुळे एनडीएला अजूनही बहुमतासाठी 9 सदस्यांची कमतरता आहे. जेडीयूकडे पाच राज्यसभा सदस्य आहेत. त्यात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचाही समावेश आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकार राज्यसभेत अजून तीन सदस्यांची नियुक्ती करू शकते. भाजप त्रिपुरातील जागा जिंकण्याची शक्यता आहे. पण त्यानंतरही एनडीएचा आकडा 114 पर्यंत पोहोचणार नाही. मात्र, त्यानंतर बहुमताचा आकडाही वाढणार असून तो 121 होणार आहे. त्यामुळे एनडीएला पुन्हा सात सदस्यांची गरज भासणार आहे. भाजपला महत्त्वाचे विधेयके मंजूर करण्यासाठी बिजेडी आणि वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. या दोन्ही पक्षाचे राज्यसभेत प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला बिजेडी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी आणि बसपाचा पाठिंबा मिळाला होता.
भाजप: 91
एआयएडीएमके: 4
एसडीएफ: 1
रिपाइं (आठवले): 1
एजीपी: 1
पीएमके: 1
एमडीएमके: 1
तामिळ मानिला काँग्रेस : 1
एनपीपी: 1
एमएनएफ: 1
यूपीपीएल: 1
अपक्ष: 1
नामनियुक्त : 5