ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढतेय, सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेणार?
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाचा...
मुंबई : एकीकडे दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे हाच दिवाळसण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात एक पैसा नाहीये. आधीच तोट्यात चाललेली शेती आता त्यातचं यंदा झालेला परतीचा पाऊस बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणतोय. परतीच्या पावसाने (Maharashtra Rain) शेतकऱ्यांची अक्षरश: दैना केलीये. अशात आता राज्य सरकारने (Eknath Shinde) ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. राजकीय नेत्यांनीही तशी मागणी केली आहे.
निलेश लंके
ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली आहे.सरकार जर संवेदनशील असतं तर त्यांच्या मंत्र्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असती आणि ओला दुष्काळ जाहीर केला असता. सरकार डोळे झाकून बसलं आहे. सरकार वेगवेगळ्या कार्यक्रमात दंग झाला असून सरकारला शेतकऱ्यांचा देणंघेणं नाही. आता झालेलं नुकसान पाहता शेतकरी वीस वर्ष यातून सावरु शकणार नाही. अशी परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करावा. जेने करुन शेतकऱ्यांना मदत मिळेल, असं निलेश लंके म्हणालेत.
रोहित पवार
सध्या होणाऱ्या पावसावरही रोहित पवार बोललेत. गेल्यावर्षी राज्यात 110 टक्के पाऊस झाला. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी आणि तत्कालीन विरोधकांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली होती. आता 126 टक्के पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी तुम्ही मागणी करत होता. आता तुमचं सरकार आहे मग ओला दुष्काळ का जाहिर करत नाही? यातून तुमचा सत्तेत असताना आणि नसताना असलेला राजकीय दृष्टीकोन दिसतो, असं रोहित पवार म्हणालेत. शिवाय तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करावा, असंही ते म्हणालेत.
विरोधी पक्षातील इतर नेत्यांनीही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकरी वर्गातून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ सरसकट मदत द्यावी. अशी मागणी होत आहे. हे शिंदे सरकार शेतकरी कष्टकऱ्यांचं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणत असतात. त्यामुळे आथा राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेणार का? शेतकऱ्यांना मदत मिळणार का हे पाहाणं महत्वाचं असेल.