जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?; निलेश राणे यांची घणाघाती टीका

| Updated on: Apr 25, 2021 | 2:00 PM

सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. (nilesh rane attacks jayant patil over anil deshmukh house raid)

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?; निलेश राणे यांची घणाघाती टीका
निलेश राणे, माजी खासदार
Follow us on

रत्नागिरी: सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला आहे. पाटलांच्या या आरोपाचा भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. (nilesh rane attacks jayant patil over anil deshmukh house raid)

निलेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत, असा टोला राणे यांनी लगावला. जयंत पाटलांनी डोकं लावून बोलावं. तुम्हाला हे शोभत नाही, असं सांगतानाच परमबीर सिंग यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते व्हिलन झाले आहेत काय? असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादीवाले बिथरले

देशमुखांची चौकशी व्हावी हे न्यायालयाला वाटले. त्यामुळेच न्यायालयाने सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यात महाविकास आघाडीच्या पोटात दुखायचे कारण काय? तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असं सांगतानाच राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही. उद्या आपलंही नाव येईल म्हणून राष्ट्रवादीवाले बिथरले आहेत. चौकशी झाली तर कुठपर्यंत नावं जातील याची त्यांना भीती वाटतेय. त्यामुळेच राष्ट्रवादीला चौकशी होऊ नये असं वाटतं, असा दावाही त्यांनी केला.

खरी नावं बाहेर येण्याची भीती

सीबीआयला राज्यात प्रवेश न करू देणारं महाराष्ट्र हे पश्चिम बंगालनंतरचं राज्य आहे. आता तर न्यायालयानेच सीबीआयला पाठवले आहे. न्यायालय ही काय भाजपची एजन्सी आहे का? असा सवाल करतानाच या आरोपात काही तथ्य नाही. हा कोर्टाचा अधिकार आहे. त्यात केंद्राचा हस्तक्षेप नाही. इतरांचीही नावं या चौकशीतून बाहेर येण्याची भीती असल्यानेच हा खेळ सुरू आहे. आता खरी नावं बाहेर येतील. आरोपी पकडले जातील. आता यांना कोणी वाचवू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

परब मातोश्रीचे एजंट

यावेळी निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. अनिल परब मातोश्रीचे एजंट आहेत. ते या गुन्ह्यात भागीदार आहेत. परब मातोश्रीला पैसे पोहोचवत होते. मातोश्री सुद्धा या गुन्ह्यात आहे. परब हे पाईपलाईनमध्ये आहेत. ते सुटू शकत नाहीत, असं ते म्हणाले.

राऊतांना अटक करा

त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवरही टीका केली. राऊतांना केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केल्याशिवया पगार मिळत नाही. राऊतांविरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ही महिला न्याय मागत आहे. त्यांच्याकडे राऊतांविरोधात पुरावे आहेत. मग कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी केला. एका महिलेला छळणारा व्यक्ती ताठमानेने फिरू कसा शकतो? त्यांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (nilesh rane attacks jayant patil over anil deshmukh house raid)

 

संबंधित बातम्या:

मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांची खोचक टीका

अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या धाडीनंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट, म्हणाल्या…

कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता काय?; देशमुखप्रकरणावर नवाब मलिक यांचा सवाल

(nilesh rane attacks jayant patil over anil deshmukh house raid)