मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे विद्यमान आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जणू मोर्चाच काढला आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांनी कुठल्या-ना-कुठल्या विषयावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. या टीकेची पातळी सुद्धा घसरल्याचे काही विधानांवरुन लक्षात येते. या सर्व टीका-टिप्पण्यांमुळे कोकणातील ‘शिवसेना विरुद्ध राणे’ हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
आमदार नितेश राणे यांनी याच महिन्यात 14 आणि 15 डिसेंबर अशा दोन दिवसात रामदास कदम यांना उद्देशून ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये नितेश राणे यांनी रामदास कदम यांचा ‘कुत्रा’ असा उल्लेख केला होता.
पहिला ट्वीट (14 डिसेंबर) : “स्व.मान बाळासाहेब असतील,राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात.. उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे.. रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही.. भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!”
दुसरा ट्वीट (15 डिसेंबर) : “हा आमचा zuko .. या पुढे रामदास कदम ला हाच उत्तर देईल.. टक्कर बराबरी ची झाली पाहिजे ना बिचारया zuko वर अन्याय नको! आता होऊ दे.. काटे की टक्कर!!!”
हा आमचा zuko ..
या पुढे रामदास कदम ला हाच उत्तर देईल..
टक्कर बराबरी ची झाली पाहिजे ना
बिचारया zuko वर अन्याय नको!
आता होऊ दे..
काटे की टक्कर!!! pic.twitter.com/zHTvVMvdv9— nitesh rane (@NiteshNRane) December 15, 2018
निलेश राणे काय म्हणाले?
माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी प्रोजेक्टवरुन रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणे यांनी आजच हे ट्वीट केले आहेत.
पहिला ट्वीट : नाणारबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील हा प्रकल्प लादणार नाही,असे सांगितले होते. तरी वेगळ्या पद्धतीने हा प्रकल्प आणण्याचे काम सुरू आहे. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही.
दुसरा ट्वीट : “रामदास कदम अडाणी मंत्री आहेत. ते म्हणाले इको सेन्सीटीव्हमधून रत्नागिरीतील ९२ तर सिंधुदुर्गतील ९० गावे वगळण्यात येतील. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारला गावे वळवण्याचा अधिकार नाही, राज्य सरकार गावे वगळू शकत नाहीत. गावे वगळण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहे.”
दरम्यान, नितेश राणेंची टीका असो वा निलेश राणे यांची टीका असो, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दोन्हींच्या टीकांकडे दुर्लक्ष केले असून, कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिली नाही. त्यामुळे रामदास कदम नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.