अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या, मी…; नितेश राणे आक्रमक

| Updated on: Sep 19, 2024 | 6:40 PM

आम्ही तुमच्या वाटेला कधी जात नाही, जाणार नाही. पण आमच्या देवावर कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही एका बापाचे आहात का? आडनाव तरी तुमचे एक आहे का? आमच्या लोकांकडे वाकड्या नजरेने बघणं थांबवलं नाही तर तुम्हाला कोणतेच सण साजरे करू देणार नाही, असा इशारा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिला आहे.

अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या, मी...; नितेश राणे आक्रमक
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. आपली एकजूट दाखवली पाहिजे. हिंदू एकत्र आल्यावर काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे. त्यामुळेच धर्म म्हणून आपण एकत्र आलंच पाहिजे. आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत. हे सरकार हिंदूंचं आहे, असं सांगतानाच हे हिंदू राष्ट्र आहे, इथे भगवा झेंडाचं फडकणार, असं भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले. तसेच अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या. मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही, असंही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितलं. सांगलीच्या बत्तीस शिराळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला संबोधित करताना नितेश राणे यांनी हे विधान केलं.

हिंदू समाजाला आव्हान दिले जात आहे. कमी लेखले जात आहे. हिंदू देवतांबद्दल काहीही बोललं जातं आहे. सर्वधर्म समभाव केवळ हिंदूंनाच सांगितला जातोय. हिंदु समाजाने सगळ्यांचा ठेका घेतला आहे का? हिंदू राष्ट्रात सर्वधर्म समभाव आम्हीच जपायचे का? विसर्जनावेळी दगडफेक करतात. इथून पुढे मोहरम आणि ईदच्या मिरवणुकी शांतपणे काढू शकणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.

दादांनी निषेध केला का?

अजितदादांना कुठे तक्रार करायची आहे, ती करावी, पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. अजितदादांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तरी निषेध करायला हवा होता. मग अशी वेळ आली नसती. मी माझ्या धर्माचे काम करतोय. हिंदू म्हणून मी लढतोय, असंही ते म्हणाले.

कायदे सर्वांना सारखेच

या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे. जे कायदे हिंदूंना आहेत, तेच मुस्लिमांनाही लागू आहेत. मात्र, तरीही आम्हालाच सर्व गोष्टींची सक्ती केली जाते. सहिष्णूता आम्हालाच शिकवली जाते. आम्हीच संयम राखायचा. अन्याय आम्हीच सहन करायचा. हे योग्य नाही. हे कुठवर चालणार? असा सवाल त्यांनी केला.

एक दिवसाची सुट्टी देतो…

हिंदू म्हणून आम्ही सण साजरे करू शकत नाही का? आपल्यात कडवटपणा निर्माण झाला पाहिजे, असं सांगतानाच पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. आम्ही आमची ताकद दाखवून देतो. बघूया दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण बघतो, असंही ते म्हणाले.