मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना पुन्हा एकदा झटका बसलाय. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटकेपासून दहा दिवस संरक्षण देण्यात आलं आहे. अशास्थितीत सिंधुदुर्ग पोलिसांकडून नितेश राणे यांची गाडी अडवण्याचा प्रकार समोर आला. तेव्हा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यात आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. मला कायदा शिकवू नका, अशा शब्दात निलेश राणे यांनी पोलिसांना सुनावलं. दरम्यान, नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण प्रकरणावर आता भाजप आणि शिवसेना नेते आमनेसामने आले आहेत.
हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळत नसेल तर यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्राच्या इतिहासातील सूडबुद्धीने वागणारं हे एकमेव सरकार आहे. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता हा सरकारचं लक्ष भाजप नेत्यांना अडचणीत कसं आणायचं आणि टक्केवारीची वसुली कशी करायची याकडे आहे. देशात कायद्याचं राज्य आहे. पण इकडे उद्धव ठाकरे यांना वाटतं की त्यांचं राज्य आहे, अशी खोचक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करत नितेश राणे यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. याबाबत आम्ही कोर्टात जाणार असल्याचा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलाय. सरकार दबावतंत्र वापरुन फक्त नितेश राणे यांच्यावर कारवाई करत आहे. यापूर्वीही मोठ्या राणे साहेबांवर कशाप्रकारे दबाव तयार करुन कारवाई केली हे आपण पाहिलं. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरही भाजपनं सत्ता कायम राखली हे शिवसेनेला पाहावत नाही. त्यामुळे बिथरलेल्या शिवसेनेकडून भीतीपोटी सरकारी यंत्रणेवर दबाव टाकण्याचं काम सुरु असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय.
शिवसेना म्हणून आम्ही या प्रकरणाकडे पाहत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत मंत्री म्हणून बोलणं योग्य नाही. पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर जे काही करायचं ते संबंधित यंत्रणा करेल. पोलीस काय करणार यात पालकमंत्री म्हणून आपण हस्तक्षेप करणार नाही. निकालात काय आदेश आहेत, त्यानुसार संबंधित यंत्रणा कारवाई करतील. कायदा आणि सुव्यवस्था बिघणार नाही याची पूर्ण जबाबदारी पोलिस विभागाची राहणार आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करतील, असंही उदय सामंत म्हणाले.
इतर बातम्या :