वाशिम : महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यात रस्त्याच्या लोकार्पणाचा एक कार्यक्रम झाला. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात एक मोठ वक्तव्य केलं. “राजकारणात खोटं बोलण्याची आवश्यकता नाहीय. मी मागच्या 40-45 वर्षात बोललो ते करुन दाखवलं. तुम्ही जे बोलला होता, ते का नाही झालं? असा कुणी पत्रकार विचारु शकत नाही” असं नितीन गडकरी म्हणाले. अकोला ते वाशिमपर्यंत 133.85 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच लोकार्पण नितीन गडकरी यांच्याहस्ते झालं.
“मी जे काही बोललो, ते केलं नाही असं कोणी म्हणू शकत नाही. जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात. राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही. मी ठरवलय यावेळी लोकसभा निवडणुकीच्यावेळी पोस्टर-बॅनर लावणार नाही. चहा-पाणी करणार नाही. मत द्यायचय द्या, नाही द्यायचय नका देऊ. प्रामाणिकपणे सेवा करीन. कुठलीही माल-पाणी मिळणार नाही. लक्ष्मी दर्शन होणार नाही. देशी-विदेशी नाही मिळणार. मी पैसा खाल्ला नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही” असं नितीन गडकरी म्हणाले.
‘गरीब-गरीब असतो’
“तुमची सेवा प्रामाणिकपणे करीन. गरीब-गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, भाषा नसते. सिलेंडर ज्या किंमतीला मुस्लिमांना मिळतो, त्याच किंमतीला हिंदूंना सुद्धा मिळतो. या देशातील गरीबी, उपासमारी आणि बेरोजगारी दूर करण्याची आवश्यकता आहे” असं गडकरी म्हणाले.
ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये जापानला मागे टाकलं
“इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमिक्स इन द वर्ल्ड. ऑटोमोबाइलमध्ये आपण 7 व्या नंबरवर होतो. आता तीच 12.50 लाख कोटीची इंडस्ट्री बनली आहे. 4.5 कोटी युवकांना रोजगार मिळालाय. भारत सरकार आणि राज्य सरकारला ऑटोमोबाइल इंडस्ट्रीकडून सर्वाधिक जीएसटी मिळतो. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये दोन महिन्यांपूर्वी भारत जापानला मागे टाकून तिसऱ्या नंबरवर पोहोचलाय. पहिल्या नंबरवर अमेरिका, दुसऱ्या नंबरवर चीन आणि तिसऱ्या नंबरवर भारत आहे” असं नितीन गडकरी म्हणाले.