सांगली : शेतकऱ्यांनो, आता ऊस लावू नका, असं सल्ला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. साखर कारखाना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.
आपल्याकडे अतिरिक्त साखर आहे. साखर शिल्लक आहे. जर जास्त साखर तयार झाली, तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल. साखर ऐवजी इथेनॉल बनवा, असेही नितीन गडकरी म्हणाले. तसेच, परदेशात साखरेला 20 रुपये दर आहे आणि आपल्याकडे 40 रुपये दर आहे, असेही गडकरींनी सांगितले.
“शेतकऱ्यांनो, आता ऊस लावू नका. साखर कारखाना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. कारखाना हा कोणत्या पक्षाच्या आहे हे महत्त्वाचे नाही. या व्यवसायासाठी जे पॅकेज दिले, आता भविष्यात असे पॅकेज देणे शक्य नाही.”, असे नितीन गडकरी म्हणाले.
तसेच, कारखान्यांनी शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांचे शोषण करु नये. शेतकऱ्यांनी पण आंदोलन करताना कारखाना बंद पडेल, इतकी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.
साखर कारखाना काढून चूक केली : नितीन गडकरी
“मागच्या जन्मी जो कोणी पाप केले असेल, ते एक तर साखर कारखाना काढतो नाही, तर वृत्तपत्र काढतो. मी जाहीर सांगतो, मी साखर कारखाना काढून चूक केली.”, असे नितीन गडकरी म्हणाले.