Nitin Gadkari | एकनाथ शिंदेंना अमृत पाजलंय, त्यांची गाडी सुसाट धावणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य!

| Updated on: Jul 08, 2022 | 5:46 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही दिवसांपूर्वीच शपथविधी झाला असून या दोघांचाही हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. या अमृतकाळाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केला जाईल, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं.

Nitin Gadkari | एकनाथ शिंदेंना अमृत पाजलंय, त्यांची गाडी सुसाट धावणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य!
Follow us on

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी आता कुठे थांबेल असं वाटतच नाही. शिंदेंची गाडी आता सुसाट धावेल. महाराष्ट्राच्या विकासाची गाडी बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त पुढे जाईल, असं वक्तव्य केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं अभिनंदन केलं. तसेच महाराष्ट्रात सुरु असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही दिवसांपूर्वीच शपथविधी झाला असून या दोघांचाही हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. या अमृतकाळाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केला जाईल, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं.

‘नवी मुंबईच्या धर्तीवर नवं पुणं, नवं औरंगाबाद हवं’

महाराष्ट्र सध्या विकासाच्या वाटेवर असून भविष्यात नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुणे आणि नवीन औरंगाबाद वसवावे, अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली. आम्ही या शहरांसाठी नवीन रस्ते बांधू. जमीन विकत घेण्याआधी राज्य सरकारने जमीन खरेदी कराव्यात, राज्य सरकारने या शहरांकडे आवर्जून लक्ष द्यावे, असे गडकरी म्हणाले.

पेट्रोल हद्दपार करा- गडकरी

साखर कारखान्यांमुळे राज्याची प्रगती झाली आहे. आता साखरेचं रुपांतर इथेनॉलमध्ये व्हावे. महाराष्ट्रातून पेट्रोल हद्दपार करा आणि इथेनॉलचा वापर केला पाहिजे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. धूर होत नाही आणि आवाजही नाही. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही एक समस्या आहे. नवी मुंबई विमानतळावर कुठूनही 17 मिनिटात नवी मुंबई विमानतळावर जाता येते.

‘महाराष्ट्र देशाचा ग्रोथ इंजिन’

देश आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा दाखला देताना नितीन गडकरी म्हणाले, ‘ 2025 ते 2030 पर्यंत आम्ही थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणे हे उद्दिष्ट ठेवले होते. पण आता पुन्हा एकदा 2030 च्या आधी आम्ही थ्री ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी असणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली आम्ही हे करू. आम्ही बुलेट ट्रेन च्या बाबतीत थोडं पाठी राहिलो आहोत गुजरात आमच्या पुढे गेला आहे. पण आमही लवकरच पूर्ण करू…

‘समृद्धी’ची एक फेज लवकरच सुरु- मुख्यमंत्री

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर ठरेल. येथे मल्टीनॅशनल प्रकल्प येत आहेत. यामुळे परिसराची समृद्धी होईल. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. सीआयआयला मी यासाठी आमंत्रित करतो. महाराष्ट्राला अजून पुढे जाण्यासाठी सीआयआयची साथ हवी आहे. टेक्स्टाइल पार्कविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आम्हाला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हे सरकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आहे. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आशीर्वाद आहे.