अहमदनगर : नगर जिल्ह्याला रस्त्यांसाठी सर्वाधिक निधी मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरवर विशेष लक्ष दिलंंय, अशा शब्दात नगरचे खासदार सुजय विखे यांनी गडकरींचं कौतुक केलं. त्यावर गडकरींची भाषणाची वेळ येताच त्यांनी कोटी केली. तुम्ही काढलेल्या उद्गारांबद्दल आभारी आहे पण मी जिथे जिथे जाईल तिथले खासदार, मुख्यमंत्री असंच बोलत असतात, असं गडकरी म्हणाले. त्यावर मंचावर बसलेल्या सुजय विखे आणि माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना हसू अनावर झालं.
आज अहमदनगरमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ते विकासकामांची भूमीपूजनं तर काही कामांचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “आज नगर जिल्ह्यातल्या अनेक कामांचं भूमीपूजन होतंय आणि लोकार्पण पण होतंय. स्वाभाविकपणे खासदार सुजय विखेंनी आपल्या भाषणात सांगितलं की नगर जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गातून सर्वाधिक निधी मिळाला. त्यांनी हे उद्गार काढले. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण मी ज्या ज्या जिल्ह्यांत जातो तिथला खासदार हेच म्हणतो, तर ज्या राज्यांत जातो तिथले मुख्यमंत्रीही आम्हालाच अधिक मिळालं, असं सांगत असतात.”
“खरं म्हणजे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन, आपल्या देशामध्ये जर उद्योग सुरु व्हायचे असतील तर कोणताही उद्योजक पहिल्यांदा विचार करतो की या चार गोष्टी देशात आहेत का? असेल तर तिथे उद्योग येतात. त्यामुळे अनेक रोजगार निर्माण होतात.”, असं गडकरी म्हणाले.
महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार आहोत, असं गडकरी म्हणाले. एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, असंही ते म्हणाले.
नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल. त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.
(Nitin gadkari reply Sujay Vikhe patil Statement nagar Inauguration of development Works)
हे ही वाचा :
गडकरींच्या कार्यक्रमाला पवार कसे आले? पवार म्हणतात, गडकरींच्या कार्यक्रमानंतर चार दिवसात बदल दिसतो
पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!