नागपूर : जर देशात आणीबाणी लागली नसती, तर आम्ही राजकारणात आलो नसतो. त्यामुळे मी आणी बाणीचा प्रॉडक्ट आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. याच अंतर्गत नितीन गडकरी यांनी ‘नितीन गडकरी, दोस्तों के बिच’ नावाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
“देशात आणीबाणी लागली आणि आमचा राजकीय प्रवास सुरु झाला. जर आणीबाणी लागली नसती, तर आम्ही राजकारणात आलो नसतो. त्यामुळे मी देशातील आणीबाणीचा प्रॉडक्ट आहे.”, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांच्या महाविद्यालयीन आणि सुरुवातीच्या राजकीय जीवनातील मित्र व साथीदारांच्या वतीने नागपुरात ‘नितीन गडकरी, दोस्तों के बिच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा देत किस्से सांगितले.
कॉलेजच्या पहिल्याच वर्षात देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी सगळेच सरकारच्या बाजूने बोलत होते. मात्र आम्ही आंदोलने व लाठ्या खाल्ल्या. सहकाऱ्याच्या स्कूटरवरुन फिरुन अर्धा कप चहा घ्यायचो.”, अशा आठवणी नितीन गडकरी यांनी सांगितल्या. तसेच, दिवंगत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव आहे, असेही नितीन गडकरी यांनी नमूद केले.
“हल्ली राजकारण म्हणजे काळी-पिवळी टॅक्सी झालीय. कुणीही कुठे जातंय. पक्षात कोण येतं, का पक्ष सोडतोय, हे कुणाला काही माहित नाही. विचारधारेबाबत एकनिष्ठपणा कमी होत चाललाय.”, असेही नितीन गडकरी म्हणाले.