पाटणा: बिहारमध्ये राजकीय तणातणी सुरू झाली आहे. भाजप (bjp) आणि मुख्यमंत्री नितीशकुमार (nitish kumar) यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमध्ये विस्तव जात नसल्याचं दिसून येत आहे. भाजपकडून जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे आता नितीश कुमार हे लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत आघाडी करणार आहेत. आघाडीच्या अनुषंगाने तेजस्वी यादव (tejashwi yadav) आणि नितीश कुमार यांच्यात या संदर्भात चर्चा ही सुरू आहे. तसेच या चर्चेवेळी या दोन्ही नेत्यांशिवाय दुसरा कोणताही नेता नव्हता. यावेळी खाते वाटपाचा फॉर्म्युलाही तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडे, विधानसभेचं अध्यक्षपद, उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद आरजेडीला देण्याचं ठरल्याचंही सांगितलं जात आहे.
नव्या सरकारची रुपरेषा जवळपास तयार करण्यात आली आहे. आरजेडीची सूत्रे तेजस्वी यादव यांच्याकडे आहे. मात्र तरीही तेजस्वी यादव हे लालूप्रसाद यादव यांच्या संपर्कात असून त्यांचा सल्ला घेत आहेत. राज्यातील इतर नेतेही नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यास आरजेडी तयार होणार नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यास तेजस्वी यादव तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याबदल्यात आरजेडी विधानसभेचं अध्यक्षपद, गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नितीश कुमार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप जेडीयूत फूट पाडत असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे. भाजपच्या या हालचाली पाहूनच नितीश कुमार यांनी काँग्रेस, डावे आणि आरजेडीशी जवळीक साधली आहे. एवढेच नव्हे तर नितीश कुमार यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यामुळे नितीश कुमार हे भाजपपासून फारकत घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तसेच गेल्या महिन्याभरापासून नितीश कुमार यांनी भाजपशी फटकून वागण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली नाही. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी आयोजित केलेलं डिनर, नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा, पंतप्रधानांनी हर घर तिरंगा या मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली बैठक आणि काल झालेली नीती आयोगाची बैठक आदी बैठकांना नितीश कुमार गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे भाजप आणि नितीश कुमार यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.