मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत वारंवार करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनीही या बंडामागे भाजप असल्याचे दाखले दिले आहेत. तर आज खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. यामागे हात आहे की पाय आहे हे माहीत नाही. ते शिंदे साहेब बघतील. पण आमचा शिंदे साहेबांवर विश्वास आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. टीव्ही9 मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी संवाद साधल्यानंतर भरत गोगावले बोलत होते. तसेच आमचं ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर आम्ही परत मुंबईला येऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, कधीपर्यंत मुंबईत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
आमच्या बंडामागे भाजपचा यात हात आहे की पाय आहे, हे मला माहिती नाही. शिंदे साहेब बघतील आता काय करायचं. उद्धव साहेब जे काही बोलले ते बोलू द्या. त्यावर काहीच आम्ही बोलणार नाही, आम्ही बाळासाहेबांना आदर्श ठेवून चाललो आहोत. वेळ येईल तेव्हा बाकी बघू. शिंदे साहेब आणि ते बघतील. आम्ही साहेबांशी थेट बोलणार नाही, असं भरत गोगावले म्हणाले.
जे काही कमी पडलं आणि नाही पडलं ही चर्चा सुरू आहे. तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली आहे. मधल्या लोकांनी उद्धव साहेबांना अडचणीत आणलं आहे. आता मागे होणे नाही, अशी स्थिती नाही. एकनाथ शिंदे घेतली त्या निर्णयाला आम्ही बांधिल आहोत. आम्ही सगळे काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्याननंतर जी काही दरी निर्माण झाली. त्यावेळी कोणी तरी हवं होतं. आदित्यही गुंतून गेले. हेही गुंतून गेले, आम्ही लोकांच्या अडचणीसाठी वेळ मागायचो. मात्र मधली लोक दाद देत नव्हती. त्यामुळे हे झालं, असं भरत गोगावले म्हणाले.
आम्ही स्वखुशीने या ठिकाणी आलो आहेत. जे खूश नव्हते. ते तुमच्याजवळ येऊन बोलत आहेत. आम्ही त्या मतावर काही बोलणार नाही. जशा तिथं मिटिंग होत आहेत. तशी त्यांची संख्या का कमी होत आहे. आता आम्ही चाळीस लोक आहोत. त्यातलं कोण का काही बोलत नाही. सर्व व्हिडिओत येत आहेत. ते वस्तुस्थिती सांगत आहेत. यामिनी जाधव काय प्रसंगातून गेल्या माहिती आहे. अशा प्रसंगी तुम्ही उभे नसाल तर काय करायचं?, असा सवाल त्यांनी केला. जसजश्या तुमच्या मिटिंग होत आहेत. तसतशी तुमची संख्या कमी होत आहे. तुमच्या मिटिंगला हजेरी लावून आमदार आमच्याकडे येत आहेत. याचा अर्थ काय आहे? असा सवालच त्यांनी उपस्थित केला.