जळगाव, दिनांक 16 जुलै 2023 : शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अखेर अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडेच गेलं आहे. अजितदादांकडे अर्थमंत्रीपद गेल्याने शिंदे गटात अजूनही अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीत अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं. त्यावेळी अजितदादांनी शिवसेनेच्या आमदारांना अत्यंत कमी निधी दिला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांना भरमसाठ निधी दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती या सरकारमध्ये होऊ शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. त्यामुळेच ही अवस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अजित पवार खरोखरच शिंदे गटाला निधी देताना हात आखडता घेणार की सढळ हस्ते निधी देणार याची जोरदार चर्चा रंगलेली आहे.
अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं तरी आता मागच्या काळासारखं होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळे मागच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील. हा निर्णय योग्य असल्याचं सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही गुलाबराव पाटील यांनी केलं.
मात्र, अजित पवार यांच्या फायली मुख्यमंत्रीच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नजरेखालून जाणार असल्याचं मोठं विधान करत गुलाबराव पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. म्हणजे अजितदादांनी मंजूर केलेली फाईल दोन चाळणीतून जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे अजित पवार यांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान आहे काय? अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
अजित पवार यांना अर्थखातं दिल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर भाष्य केलं आहे. आता सत्तेत तीन वाटेकरू झाले आहेत. अजित पवार हे मातब्बर नेते असल्यामुळे त्यांना सन्मानाचं खातं देणं गरजेचं होतं, असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. ते मीडियाशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची खात्री आम्हाला आहे, असं ते म्हणाले. अर्थ खाते अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी मिश्किल टिप्पणीही केली. मला दहावीत 56 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी 55 टक्क्यांवर डीएडचा मेरिट क्लोज झाला होता. त्यामुळे माझा नंबर डीएडलाही लागला होता. मी डीएड केलं असतं तर मीही ‘गुलाब गुरुजी’ नावाने ओळखलो गेलो असतो, अशी मिश्किल टिप्पणी गुलाबराव पाटील यांनी केली.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपत्रातेप्रकरणी नोटीसा येणं, त्याला अध्यक्षांनी उत्तर देणं ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. यात आमचा आणि इतर कोणाचाही हस्तक्षेप नसावा. मात्र अध्यक्ष सद्सदद्विवेकबुद्धीने निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी येत्या दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याविषयी गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली.