नवी दिल्ली: राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार एकूण 26 दिवस उलटून गेले आहेत. तरीही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. एवढेच काय देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी फडणवीस यांना अजूनही कोणतंच खातं देण्यात आलेलं नाही. त्यामुळे महिना होत आला तरी शिंदे सरकारात फडणवीस बिनखात्याचेच मंत्री आहेत. तर, दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar) हे दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन जवळपास एक महिना झाला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान पाचवेळा दिल्लीवारी केली. मात्र, त्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना फक्त उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. मात्र, त्यांना कोणतंही खातं देण्यात आलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात अपात्र आमदारांवरील सुनावणी होणार आहे. त्यानंतरच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मंत्रिपद मिळावे म्हणून अब्दुल सत्तार आणि गिरीश महाजन यांनी दिल्ली गाठली आहे. हे दोन्ही नेते दिल्लीतील बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी काल अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सांगितलं जातं.
मंत्रिमंडळाची यादी तयार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये त्याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या 3 तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. दिल्लीत चर्चा करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कोर्टाच्या निकालाचा काही संबंध नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
दिल्लीत मी अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा करायला आलो आहे. त्यांची भूमिका समजून घेऊ लवकरच ते सोबत येतील. एकत्र काम करायचं आहे. यासाठी त्यांच्याशी बोलायला आलो आहे, असं ते म्हणाले. जेव्हा 40 आमदार बाहेर जातात तेव्हा कँप्टनने विचार करायला हवा. मी तर आता मुख्यमंत्री आले की राजीनामा देणार आहे. त्यावेळी बघू दूध का दूध पानी का पानी होईल. किसमे कितना है दम देखते है. कोण गद्दार आहे ते कळेलच, असं आव्हानच सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं.
मी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटणार नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. ते ठरवतील ती भूमिका आम्हाला मान्य आहे, असंही ते म्हणाले. निकाल आमच्या बाजूने लागेल. शिवसेना आमची आणि धनुष्यबाण ही आमचा आहे, असा दावाही त्यांनी केला.