मुंबई : राज्यात राजकीय घडामोडी जोरात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कामाला लागले आहे. २०१९ मधील अजित पवार यांचे बंड शरद पवार यांनी मोडून काढले होते. आता पुन्हा तशीच तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांच्या गटात गेलेले काही लोक परत येत आहे. काही जणांवर कारवाई सुरु केली आहे. अजित पवार यांच्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व जणांना नोटीस देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिस्तभंगची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
रविवारी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही शपथ घेतली. या सर्वांवर शिस्तभंगची कारवाई करण्याची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवात झाली आहे. त्यासाठी या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अपात्र ठरवण्याची कारवाई सुरु केल्याची ही नोटीस आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षांनाही पत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांकडे मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ जणांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याचिका मिळाली असल्याचे सांगत आपण अभ्यास करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. त्यांनी कायदाचा अभ्यास करुन त्या नऊ जणांना नोटीस पाठवली असेल. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यांना नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.