मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलं आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या संख्येनं होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसींना आरक्षण मिळू नये, असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तसंच भारतीय जनता पार्टी याच्या विरोधात संघर्ष करेल आणि हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही पाटील यांनी सोमवारी दिला. (Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government on the issue of OBC reservation)
भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. समारोप प्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर आणि ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. मुंबईत झालेल्या या बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. संगमलाल गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले तरीही त्या सरकारचे ओबीसी मंत्री सातत्याने खोटं बोलत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबवायची म्हणजे त्यावेळी मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहील, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न दिसतो. मात्र, भाजपा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपा संघर्ष करत राहील. त्यासाठी पक्षातर्फे ओबीसी जागर अभियान राबविण्यात येईल, असंही पाटील यांनी सांगितलं.
भाजपा ओबीसी मोर्चा सध्या प्रचंड घोडदौड करत आहे. अनेक ठिकाणी कार्यकारिणी बैठकी झाल्या. ओबीसी समाजाचे प्रश्न केवळ भाजपाच सोडवू शकते, याची जाणीव ओबीसी समाज बांधवाना आता झालेली आहे. pic.twitter.com/vYE3oCTVkf
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 19, 2021
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी जोरदार संघर्ष केल्यामुळे भाजपाच्या बारा आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन झाले. विधानसभेत एक एक मत महत्त्वाचे असताना पक्षाचे बळ कमी होण्याचे नुकसानही पक्षाने या विषयावर सोसलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाने राज्यभर एक हजार ठिकाणी निदर्शने केली आणि त्यामध्ये आपण स्वतः आणि देवेंद्र फडणवीस यांनी अटक करून घेतली. पाच जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये मूळच्या ओबीसींच्या राखीव जागा खुल्या झाल्या असल्या तरीही भाजपाने सर्व जागांवर ओबीसी उमेदवारच उभे केले. भाजपा सरकारने मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे भाजपाला ओबीसींबद्दल आत्मियता असल्याचं स्पष्ट होतं, असंही पाटील यांनी म्हटलंय.
ओबीसी आरक्षणासाठी मी आणि देवेंद्र जी यांनी स्वतःला अटक करून घेतली. महाराष्ट्रात एक हजार ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. यातील कित्येक जण ओबीसी नव्हते, मात्र ओबीसी समाज माझा आहे, असे समजून त्यांनी संघर्ष केला. pic.twitter.com/zWoqd0ZEGr
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 19, 2021
संबंधित बातम्या :
पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की हेटाळणी?; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
बेस्ट CM ला देव तरी कसा पावेल, आषाढी वारीवरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government on the issue of OBC reservation