मुंबई : राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) होणार आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बांठिया आयोगाचा अहवालानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2 आठवड्यात राहिलेल्या निवडणुकीचा प्रक्रिया जाहीर करा, 367 ठिकाणी निवडणूक घ्या, असा आदेश दिलाय. या निर्णयाचं स्वागत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही केलंय. मात्र, यावरुन श्रेयवादाची लढाईही पाहायला मिळत आहे. युती सरकारनं दिलेला ओबीसी आरक्षणाचा शब्द पाळला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलंय. त्यावर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात श्रेयवादाची लढाई निश्चितच होत राहील. पण ओबीसींना आरक्षण मिळालं ही चांगली गोष्ट आहे. जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की ओबीसी आरक्षण आम्ही मिळवून दिलं. तर मग अशाच पद्धतीनं त्यांनी धनगर समाजालाही आरक्षण मिळवून द्यावं, असं आव्हान चव्हाण यांनी फडणवीसांना दिलंय. तसंच बांठिया आयोग हा महाविकास आघाडी सरकारने स्थापन केला होता, असंही चव्हाण यांनी आवर्जुन सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारमधील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या केसबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितलं आहे. पण त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. शिंदे गटाला पार्टी फूट पूर्ण झाली आहे असं दाखवावं लागेल. तोच मुद्दा कोर्टाच्या निरीक्षणात पुढे येईल. सर्व गोष्टी या कोर्टाकडूनच स्पष्ट होऊ शकतात. कारण शिवसेना नक्की कुणाची हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातूनच निकाली निघू शकेल, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलंय.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात अनेक संवैधानिक गोष्टी असल्याने हे प्रकरण लार्जर बेंचकडे देण्याचं सूतोवाच केलं. तसेच या प्रकरणावरील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली. दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाच्यावतीने हरीश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.