नवी दिल्ली : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच आज अचानक निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाला धक्का बसण्याची मालिका सुरुच आहे. कारण नेते आणि कार्यकर्ते पक्षाला सोडून शिंदे गटात जात आहेत. आधीच ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात गेल्याने शिवसेनेत ( Shiv Sena ) मोठी फूट पडली. पक्षाच्या अस्तित्वाचा मोठा पेच निर्माण झाला. जो थेट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावून पोहोचला. आता आणखी एक बातमी अशी येतेय की, ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खासदाराने ठाकरे गटात असताना देखील शिंदे गटाच्या बाजुने प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे जर ही माहिती खरी ठरली तर ठाकरे गटातील आणखी एक खासदार लवकरच शिंदे गटात सहभागी होऊ शकतो.
गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सहभागी झालेले तेरावे खासदार आहेत. त्यानंतर ठाकरे गटात उरलेल्या खासदारांची संख्या ५ इतकी होती. पण मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून फक्त चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा तो पाचवा खासदार कोण याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं नाही. शिंदे गटात सहभागी झालेले ४० आमदार आणि १३ खासदारांनी निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे शिंदे यांची बाजू बळकट असल्याचे आयोगाने आज आपल्या निकालात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पहिल्यांदाच इतकी मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांच्या सोबत भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. पुढे त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. ज्यामुळे शिंदे गट आणखी मजबूत झाला आणि पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांनी कामांचा धडाका लावला. मुंबई महापालिकेची निवडणूक देखील कधीची लागू शकते. त्यामुळे मुंबईत देखील कामांचा सपाटा सुरु झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यामुळे त्यांचं लक्ष हे स्पष्ट आहे. शिंदे गट आणि भाजपला आता मुंबई महापालिका ठाकरे गटाकडून जिंकायची आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ठाकरे गट, भाजप आणि निवडणूक आयोगावर देखील टीका केली. देशात आला लोकशाही उरली नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. पण असं असलं तरी त्यांच्यापुढे आता मोठं आव्हान असणार ते म्हणजे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांना सोबत ठेवण्याचं. कारण मुळ पक्षच आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वाढली आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं अजून बाकी आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागून असणार आहे.