नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जणू भूकंपच आला. पवार कुटुंबीयांवर पडलेल्या धाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची जप्त झालेली मालमत्ता आणि संजय राऊत यांच्या मालमत्तेवर आलेली टाच या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आलं होतं. अनेक नेत्यांनी मीडियासमोर येऊन जाहीर तर्कही मांडले. मात्र, या सर्व नेत्यांचे तर्क फोल ठरले आहेत. फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार-मोदी भेटीबाबत अत्यंत तंतोतंत माहिती दिली होती. पवार यांची ही माहिती खरी ठरली आहे. आज दुपारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मोदींना भेटण्यामागचे कारण सांगितलं. त्यामुळे अजित पवार यांनीच या भेटीबाबत अचूक प्रतिक्रिया दिल्याचं शिक्कामोर्तब झालं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डीत होते. त्यांनी विविध कामांचं भूमिपूजन केलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवादही साधला. त्यांना शरद पवार आणि मोदी भेटीबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरून आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे त्यांनी मोदींची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही माहिती दिली असावी, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या आमदारांच्या नियुक्तीवर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आघाडीतील नेते नाराज आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. त्यानंतरही हा तिढा सुटलेला नाही.
शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मोदींबाबतच्या भेटीचा तपशील दिला. शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राऊत हे पत्रकार आणि राज्यसभेतील सदस्य आहे. त्यांच्यावरील कारवाई हा अन्याय आहे, असं मोदींना सांगितल्याचं पवार म्हणाले. तर अडीच वर्ष झाले तरी राज्यपालांनी 12 विधान परिषद सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. राज्यातील नेत्यांनी भेटून राज्यपालांना या नियुक्तीबाबत विनंतीही केली. पण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला नाही, असं पवारांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं. पवारांनी थेट आता पंतप्रधानांनाच राज्यापालांची तक्रार केल्याने तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
संबंधित बातम्या:
Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवारांची मोदींसोबत 25 मिनिटं भेट, अजित पवारांनी भेटीचं कारण सांगितलं