मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असतील तरी सत्ता स्थापनेसाठी (Devendra Fadnavis on Government Formation) अनेक पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरुन भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत नवी सत्ता समीकरणं तयार करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपशिवाय इतर कुणाची सत्ताच येऊ शकत नाही (Devendra Fadnavis on Government Formation), असा दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत आमदारांना भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस म्हणाले, “राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही. मुंबईत येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. लोकांमध्ये जाऊन भाजपचेच सरकार येणार असल्याचं ठासून सांगा. जेव्हा सरकार येणार असेल तेव्हा मुंबईत बोलावू.”
सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलावू. तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा उल्लेख करणेही टाळले.
‘तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून’
आशिष शेलार यांनी बैठकीची अधिकृत माहिती देताना आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इतर पक्षातील चर्चांसोबतच सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहे.”
राज्यभरात 90 हजार बुथवर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. उद्यापासून (15 नोव्हेंबर) ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून (16 नोव्हेंबर) शहरी भागातील आमदार, परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहे, अशीही माहिती आशिष शेलार यांनी दिली.