नवी दिल्ली: लखमीपूर हिंसेप्रकरणी आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेचा निषेध म्हणून सर्व विरोधी पक्षाने आज संसदेबाहेर लाँगमार्च काढला. तर, लखमीपूर हिंसेची लढाई संपलेली नाही. ही लढाई सुरूच राहील. याप्रकरणी गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
लखमीपूर हिंसेप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी संसदेबाहेर लाँग मार्च काढला. त्यानंतर विरोधक मीडियाला सामोरे गेले. यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संपणार आहे. लखीमपूर खिरीची लढाई अजून संपली नाही. ही लढाई सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिलं आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट आला. तुम्ही एसआयटी स्थापन केली. तुमचीच एसआयटी आहे. तरीही तुम्ही एसआयटीचा रिपोर्ट मानत नाही त्यामागचे कारण काय?, असा सवाल राऊत यांनी केला.
देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन आम्हाला सवाल करतात. पण तुमच्याच राज्यात तुमच्या नाकाखाली खून, हत्या होत आहेत. त्यावर तुम्ही कारवाई करत नाही. त्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तरी विरोधक म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सवाल विचारत राहू. आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा. आज 12 खासदारांना निलंबित केले. पुढच्यावेळी 50 काय आमच्या सर्वांना निलंबित करा. पण आम्ही गप्प बसणार नाही. सवाल करतच राहू. राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले. राहुल आणि प्रियंका गांधी हे त्या रात्री लखीमपूरला आले नसते, त्यांनी हा मुद्दा लावून धरला नसता तर हे प्रकरण त्याच रात्री रफादफा केलं असतं. राहुल आणि प्रियंका यांच्यामुळेच हे प्रकरण जगासमोर आलं. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारच मानतो, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध; विनायक राऊतांकडून गंभीर आरोप
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली, राऊतांचं थेट आव्हान