नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाचवेळा पत्र लिहून औरंगजेबाची माफी मागितली होती, असा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सुधांशू त्रिवेदींविरोधात संतापाची लाट उसळली होती. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर त्रिवेदींना ठोकून काढण्याची चपलेने मारण्याची भाषा केली होती. त्रिवेदींवना चोपून काढण्याची भाषा करणारे उदयनराजे संसदेत त्रिवेदींच्या मांडीला लावून बसले होते. त्रिवेदींच्या विधानाला आणि शायरीला हसून दाद देत होते. त्यामुळे आता उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
राज्यसभेत सोमवारी 7 ऑगस्ट रोजी दिल्ली सेवा बिल सादर करण्यात आलं. त्यावरील चर्चेत सुधांशू त्रिवेदी यांनी भाग घेतला. उदयनराजे भोसले राज्यसभेत त्रिवेदींच्याच बाजूला मांडीला मांडी लावून बसले होते. यावेळी त्रिवेदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. गुजरातमध्ये काँग्रेसचे व्होट अर्धे केले. पंजाबमध्ये काँग्रेसला स्विच्ड ऑफ केलं. दिल्लीत काँग्रेसला साफ केलं तरीही तुम्ही आपला माफ केलं. तुम्ही दोघं कशासाठी एकमेकांसोबत आला आहात हे दिल्लीतील जनता जाणून आहे, असं सुधांशू त्रिवेदी यांनी शायराना अंदाजमध्ये म्हटलं. त्यावेळी सभागृहात एकच खसखस पिकली. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले उदयनराजे भोसलेही त्रिवेदींना हसून दाद देत होते.
त्यानंतर, शाम तक सुबह की नजरों से उतर जाते है, इतने समझौतौंपर जीते है कि जमीर भी मर जाते है, असा शेर त्रिवेदी यांनी ऐकवला. त्यावर दिलखुलास हसत उदयनराजे यांनी दाद दिली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. काल परवा पर्यंत त्रिवेदींना पक्षातून काढून टाकण्याची, त्यांना ठोकून काढण्याची, चपलेने मारण्याची भाषा करणारे, त्रिवेदी यांची लायकी काढणारे उदयनराजे त्रिवेदी यांच्याच मांडीला मांडी लावून बसताना त्यांच्या विधानावर दाद देताना पाहिल्यावर विरोधकांनी उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उदयनराजे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्या पद्धतीने त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केले, ते पाहता आमचे देखील रक्त सळसळते. मग त्यांच्या वंशजांचे रक्त का नाही सळसळत? हा प्रश्न आहे, असा हल्लाच नाना पटोले यांनी चढवला आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. ही लाचारी आहे ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या शेजारी बसून बेंच वाजवावा लागतो ही लाचारीच आहे, असा हल्लाच अरविंद सावंत यांनी चढवला आहे.
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उदयनराजे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे भोसले आणि सुधांशू त्रिवेदी हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेत कोणी कुठे बसायचं याचा निर्णय राज्यसभेचे सभापती घेत असतात. कोणाच्या पोटात त्याच्यामुळे दुखण्याच्या काही कारण नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले. तर, ज्या पक्षात जो असतो तो वाघच असतो. प्रत्येक पक्षाच्या आयडोलॉजिप्रमाणे तो वागत असतो. आपल्या पक्षाच्या धोरणानुसार भूमिका घेतली नाही, असा एकही नेता नाही. प्रत्येक नेत्याच्या क्लिप काढून पाहिल्या तर लक्षात येईल, असं आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.
शंभूराज देसाई यांनीही या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका केलेल्या उदयनराजे यांनी बाक वाजून त्यांच्या भाषणाचे कौतुक केलं असेल तर दोघेही भाजपचे खासदार आहेत. पक्षाच्या, देशाच्या हिताचा मुद्दा जर त्रिवेदींनी मांडला असेल आणि त्याला उदयनराजे यांनी दाद दिली असेल तर वावगं नाही. अगदी विरोधी पक्षातील व्यक्तीने सकारात्मक मुद्दा मांडला तरी आपण त्याला दाद देतो, अशी सावध प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.