मुंबई: सातत्याने वादग्रस्त विधान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांचं आणखी एक विधान भोवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची थेट विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तुलना करणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच महागात पडलं आहे. राज्यपालांच्या या विधानाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय पक्षांपासून ते सामाजिक संघटनांपर्यंत सर्वच वर्गातील लोकांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विधानवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांचा निषेध म्हणून कुठे प्रतिकात्मक धोतर जाळलं जात आहे, तर कुठे त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले जात आहेत. तर कुठे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला जात आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत हेच चित्रं दिसत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मपवईतील गॅलरीया मॉल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उग्र निदर्शने केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला विनंती करून या राज्यपालांची बदली इतर राज्यात करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
सोलापुरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून कोश्यारिंचा निषेध नोंदवला. यावेळी राज्यपाल चले जावच्या घोषणाही देण्यात आल्या.
राज्यपाल हे सातत्याने राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांचा निषेध करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी व्यक्त केली.
पुण्यात युवक काँग्रेसने राज्यपालांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. पुण्यातील लाल महालासमोर युवक काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यपालांचा फोटो असलेलं बॅनरही आंदोलकांनी जाळलं. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमध्ये शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी शिवप्रेमींनी प्रतिकात्मक धोतर जाळून कोश्यारी यांचा निषेध नोंदवला. धोतर जाळतानाच कोश्यारी यांच्या फोटोला जोडेही मारणअयात आले. नाशिकच्या सातपूर परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापुरातील शिवाजी चौकातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे राज्यपालांच्या विरोधात प्रचंड निदर्शने केली. यावेळी राज्यपालांचा फोटो असणाऱ्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाने जोरदार आंदोलन केलं. शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत निदर्शने केली. एकाचवेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.