उस्मानाबाद : उस्मानाबादमधील (Osmanabad News) आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, उस्मानाबादमध्ये अज्ञातांनी एसटी बस फोडल्यात. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर (Tyre Burned) जाळले. याचा परिणाम उस्मानाबाद बस डेपोच्या (Osmanabad ST Bus) वाहतुकीवर झाला आहे.
उस्मानाबादमध्ये सध्या तणावपूर्ण वाचावरण पाहायला मिळतंय. उस्मानाबाद शहरातील डेपोतील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तसंच तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्तही वाढण्यात आला आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेलं कैलस पाटील यांचं आंदोलनाचे तीव्र पडसाद आता उस्मानबादमध्ये उमटू लागले आहेत.
अनेक शेतकरी हे कैलास पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. उस्मानाबादेतली पीक विम्याचं आंदोलन आता चिघळत असल्याचं पाहायला मिळतंय.
24 ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आंदोलन सुरु केलं होतं. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, अशी त्यांची मागणी होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कैलास पाटील आमरण उपोषण सुरु आहे.
दरम्यान, आमरण उपोषण करणाऱ्या कैलास पाटील यांच्या समर्थनात उतरलेल्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरु केलं आहे. उस्मानाबादमधील वेगवेगळ्या भागात या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढतोय. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्यानं परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जातेय.
दोन दिवसांपूर्वीच कैलास पाटील यांना प्रशासनाकडून एक पत्र देण्यात आलं होतं. उपोषणामुळे कैलास पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्यानं प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आपण उपोषण सोडणार नाही, असं कैलास पाटील यांनी म्हटलं होतं.