उस्मानाबादः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरातील नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे या प्रसंगी अनेक आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. एकनाथ शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या (Marathwada Shivsena) तीन खासदारांपैकी एक खासदार शिंदे गटात गेले आहेत. उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) मात्र मरेपर्यंत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं आज ठणकावून सांगितलं. अडचणीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या सोबत उभा राहणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. तसंच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं, असं साकडं आई तुळजाभवानीकडे घातलं. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी एक जागृत देवस्थान मानलं जातं. येथील भावनीमातेला ओमराजे निंबाळकरांनी आज साकडं घातलं.
आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ओमराजे निंबाळकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ज्या माणसाच्या घरात ग्रामपंचायत सदस्य नव्हता त्या माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी आमदार आणि खासदार केलं. हे ऋण मी फेडू शकत नाही. पण मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही. अडचणीच्या काळात साथ सोडणं चुकीचं आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी बंड केलंय त्यांना शिवसैनिकांनी जागा दाखवली आहे. आता शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशी टीकाही ओमराजे निंबाळकर यांनी आमदार तानाजी सावंतांचं नाव न घेता केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तानाजी सावंत हे शिंदे गटात गेले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा आज 27 जुलै रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने ‘सामना’चे संपादर संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या जोरदार चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून या घटनेमुळे शिवसेना पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या शक्यतांना उद्धव ठाकरेंनी मुलाखतीद्वारे चोख उत्तर दिलं आहे. शिवसेनेतून बाहेर गेलेले आमदार आणि खासदार हे एखाद्या झाडावरून पडलेल्या पाला पाचोळ्यासारखे आहेत. झाडाची पानगळ संपल्यानंतर नवी पालवी फुटेल आणि शिवसेना रुपी झाड पुन्हा एकदा बहरून येईल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळही फुलांची सजावट केली असून यात फुलांपासून तयार कऱण्यात आलेल्या धनुष्यबाणाचे चिन्ह सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.