राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एका महिला नेत्याने त्यांच्या घोषणेची आठवण करुन दिली. त्यांना बदाम पाठवले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ‘मी कोल्हापुरचा माणूस आहे. मला बदामाची आवश्यकता नाही’ असं म्हटलय. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवले. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहेत. रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना, मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण करुन दिली.
“महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तुम्हाला बदाम पाठवतोय. कारण आपण स्वत: घोषणा केली आहे. आता मुलींच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. माझ्या सगळ्या मुली शासन आदेश निर्गमित व्हावा, उच्च शिक्षण मोफत केलं जाणार त्याची वाट बघतोय. दादा हे बदाम खावेत, त्या घोषणेची आठवण व्हावी, एवढची माफक अपेक्षा आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
त्या कन्फ्यूज झाल्या असतील
त्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. “रोहिणी खडसे माझ्यामध्ये आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कन्फ्यूज झाल्या असतील. ते चंद्रकांत पाटील त्यांच्या तालुक्यातील मुक्ताई नगरचे आहेत. त्यांच्यासाठी हे बदाम असावेत” असं चंद्रकांत पाटील यांनी सुचवलं. ‘मी कोल्हापूरचा माणूस आहे. मला बदामाची आवश्यकता नाही’ असं त्यांनी सांगितलं.