लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्याच्या मतदानाला दोन दिवस उरले आहेत. महाराष्ट्रात प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. प्रत्येक निवडणुकीत एक वोट शिफ्टिंग बघायला मिळतं. यावेळी मुस्लिम मत उद्धव ठाकरेंकडे जातायत. मराठी प्लस मुस्लिम मतांच्या बेरजेमुळे भाजपा नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेत का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत झालेला बदल समजावून सांगितला.
“मराठी माणूस कवेळ मराठी नाहीय. तो हिंदू देखील आहे, तो कट्टर हिंदू आहे. मूळामध्ये उद्धव ठाकरेंनी एक प़ॉलिटिकल अर्थमॅटिक मांडलं. उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण’
“म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हे खपवून घेतल नसतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. “त्या पलीकडे उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे. अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण. त्यावर साधा निषेधाचा शब्द नाही, स्पष्टीकरण नाही, हे लांगुलचालन स्पष्टपणे दिसतय. मी स्पष्टपण सांगतो निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, पण अशी वेळ आली असती, एखादी निवडणूक हरावी लागतेय, म्हणून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिराव लागेल, मी निवृत्ती घेतली असती” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.