पालघर : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपने देश विकायला काढला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे. अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असं आवाहन नाना पटोले यांनी मतदारांना केलंय. (Nana Patole’s appeal to voters to defeat BJP in Palghar ZP elections)
जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रचारसभेत पटोले बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले की, ‘काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला, त्यासाठी जादा निधीही दिला. आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कट्टीबद्ध आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. भाजपा सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती मविआ सरकारने पुन्हा सुरु केली’.
‘भाजपाने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस 900 रुपये झाला, एवढा महाग गॅस गरिबांना परवडत नाही. त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तु बनून राहिली आहे. यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपाचा डाव आहे. सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी रहिलेली आहे व यापुढेही उभी राहिल’, अशी ग्वाही यावेळी पटोलेंनी दिलीय.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, प्रदेश सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रफीक भुरे किसान काँग्रेसचे पराग पाष्टे, पालघरचे सहप्रभारी संतोष केणे आदी उपस्थित होते.
पालघर जिल्हातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये रिंगणात कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज पारोर येथे उपस्थित मतदारांना, कार्यकर्तोंना संबोधित केले. pic.twitter.com/nxP6KEobQv
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 29, 2021
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या पोटनिवडणुकीसाठी दलित पँथरने काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याने पाठिंबा देत असल्याचे दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्या आहेत, त्याला भाजप कारणीभूत आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तर भाजप मात्र आरक्षण संपवायला निघाला आहे, असा आरोप पटोले यांनी केलाय. देशाला विकून देश चालवण्याचं काम भाजप करत आहे. पण आता भाजपला संपवण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचं लोकांना कळायला लागल्याचं पटोले यांनी म्हटलंय.
भाजपची सत्ता आल्यानंतर माजी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुलाचं उत्पन्न हजार पटीनं वाढलं. अशी काय चादूची कांडी आहे की त्यांचं उत्पन्न इतकं झपाट्यानं वाढलं. ते देशातील तरुणांनाही सांगा म्हणून तरुणांची बेकारी जाईल, असं पत्र आपण अमित शाहांना लिहिल्याचं सांगत पटोले यांनी शाहांना जोरदार टोला लगावलाय.
इतर बातम्या :
पुण्यात भाजप-मनसे युती नाहीच? राज ठाकरे पुन्हा 2 दिवसाचा दौरा करणार, मनसेचा नेमका आकडा किती?
संजय राऊतांपेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची जास्त माहिती, नितेश राणे यांचा टोला
Nana Patole’s appeal to voters to defeat BJP in Palghar ZP elections