माढा (सोलापूर) : राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदार संघातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता पंढरपूरचे काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला दुसरा मोठा धक्क बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते कल्याणराव काळे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असून दोन साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. कल्याणराव काळे यांच्या रूपाने आघाडीला माढा मतदार संघातील हा दुसरा धक्का असणार आहे, कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.
वाचा : भाजपची गुगली, माढ्यात मोहिते पिता-पुत्र नाही, तिसराच उमेदवार जाहीर
माढा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या संजय शिंदे यांना अपक्ष असताना भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष होता आले होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून भाजपच्या नेत्यांना मामा बनविले आहे. त्यामुळे संजय शिंदे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश आणि राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे संजय शिंदे यांना पराभूत करून माढा मतदार संघात कमळ फुलवायचे आहे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा समाना रंगणार आहे. त्यात मोहिते पाटील भाजपमध्ये गेले आहेत. जर कल्याणराव काळेही भाजपच्या गळाला लागले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच आणखी एक खिंडार पडेल, हे निश्चित.