बीड | 5 डिसेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय मतभेद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. दोघाही भावा-बहिणीने एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणीही केली आहे. दोघेही निवडणुकीच्या मैदानात एकमेकांच्या समोरासमोरही आले आहेत. त्यामुळे मुंडे बहीण भाऊ पुन्हा कधीच एकत्र येणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, राजकारणाच्या पटलावरची गणितं बदलली आणि या बहीण -भावातील दुरावाही दूर झाला आहें. तसं चित्र आज बीडमध्ये पाहायला मिळालं. बीडकरांनी हे दृश्य याची देही याची डोळा पाहिलं. महाराष्ट्रानेही दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्याचं पाहिलं आणि सर्वांनाच हायसं वाटलं.
राज्य सरकारने बीडच्या परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी परळीत आल्यावर आधी गोपीनाथ गडाला भेट दिली. सर्व नेत्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
सर्व नेते स्मृतीस्थळावर आल्याने पंकजा मुंडे यांनी प्रत्येकाचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केल्यानंतर पंकजा या धनंजय मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी पुढे सरसावल्या. धनंजय मुंडे यांना श्रीफळ देण्यासाठी पंकजा जाताच धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीची गळाभेट घेतली. बहिणीची पाठ थोपटली. त्यावेळी पंकजा मुंडेही भारावून गेलेल्या दिसल्या. दोघा भावाबहिणीची गळाभेट पाहून अनेकांना गहिवरून आले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळावरच कुटुंबातील हे दिलासादायक चित्र पाहून अनेकांना हायसं वाटलं. या निमित्ताने दोन्ही भावाबहिणीमधील दुरावा दूर झाल्याची चर्चाही रंगली होती.
त्यानंतर शासन आपल्या दारीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं. पंकजा मुंडे यांच्या भाषणानेच या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मंचाकडे पाहत होते तेव्हा उकाडा होत होता. डिसेंबरच्या महिन्यात गर्मी का होत आहे, लक्षात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र आले आहेत. त्याहीपेक्षा गर्मीचा पारा अधिक वाढला कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत.
मला मीडियाने विचारलं. ताई तुम्ही कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हटलं मंचावर विधानसभा सदस्य आहेत. संवैधानिक पदावरील लोक आहेत. पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं. परळीची सेवा करताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं मनात वाटायचं. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा या कामाचं बीजारोपण केलं. धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.