बीड : 26 जुलैरोजी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा वाढदिवस आहे. मात्र यंदा त्यांनी आपला वाढदिवस (birthday) साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या राज्यभरात पूर परिस्थिती आहे. नद्यांना आलेले पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले, त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकणी शेत जमीनी वाहून गेल्या आहेत. बळीराजाला मोठा फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. माझ्या वाढदिवशी आपण सामाजिक कार्य करा, पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या शेतकरी बांधवांना मदत करा. वाढदिवसानिमित्त मला भेटायला न येता सामाजिक कार्य करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
पंकजा मुंडे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मला भेटायला येऊ नका, माझा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा. सामाजिक कामे करा. आज राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे. काही गावांना देखील पुराचा फटका बसला आहे. घरा-दारात पाणी शिरल्याने लोकांवर स्थलांतरणाची वेळ आली. अशा लोकांना मदत करा. माझा वाढदिवस साधेपणाने साजरा करा असे पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटले आहे.
दरम्यान दुसरीकडे अजूनही पंकजा मुंडे यांना भाजप नेतृत्वाकडून योग्य संधी मिळत नसल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हा पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असे वाटत होते. काही काळ त्यांच्या नावाची चर्चा देखील होती. मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पकंजा मुंडे यांना आता तरी संधी मिळेल अशी चर्चा चालू होती. विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे या दावेदार मानल्या जात होत्या, मात्र विधान परिषदेत देखील त्यांना संधी मिळाली नाही. पंकजा मुंडे यांना वारंवार डावलण्यात येत असल्याने मुंडे समर्थक हे भाजप नेतृत्वावर नारज असल्याची माहिती समोर येत आहे.