सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्या नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून सुरू असतात. मध्यंतरी पंकजा मुंडे यांची बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनीही पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं अशी आपली इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. पण या चर्चांना आता पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. मी नाराज नाही. मी कुणावर नाराज असणार? असा सवाल करतानाच मी 2024च्या निवडणुकीच्या (election) कामाला लागले आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. त्यामुळे पंकजा मुंडे आता नाराजी विसरून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं स्पष्ट झालं आहे.
सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपण कुणावरही नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. मी नाराज नाही. नाराज असण्याचा प्रश्नच नाही. कुणावर नाराज असणार? असं सांगतानाच तुम्ही जर दसरा मेळाव्याला आला नाही तर मी तुमच्यावर रागवेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
सभा म्हटल की टीका टिप्पणी चिखलफेक होते. पण आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही. चिखल तुडवणाऱ्यांचा आहे, असं त्या म्हणाल्या. मी घरातच बसून असते ही अफवा आहे. पण मी घरात बसून राहत नाही. मी कधी तुम्हाला नाशिकला दिसेल, तर कधी सिंदखेडराजाला दिसेल. माझे काम सुरू आहे. मी कुणावर नाराज नाही. मी 2024च्या तयारीला लागले आहे. त्यामुळे मी नाराज असल्याच्या चर्चा बंद करा, असं आवाहन त्यांनी केलं.
माझ्या मेळाव्याला गर्दी होते. मी गर्दी करते. हे चांगले आहे. माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी चांगले आहे ना. जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, ही गर्दी तुमची ताकद आहे. ही गर्दी जपा. अमित भाई पण आले होते मेळाव्याला, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
गोपीनाथ मुंडे हे अटलबिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराचा वारसा आहे. मी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचा वारसा चालवते. मी फक्त गोपीनाथ मुंडे यांचा वारसा नाही चालवत. तर सर्व नेत्यांचा वारसा चालवते, असं त्या म्हणाल्या.