मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी भाजप विधान परिषदेच्या पाच जागा लढवत असल्याने पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल असं सांगितलं जात होतं. मात्र, भाजपने (bjp) पंकजा समर्थक राम शिंदे यांना संधी दिली. इतकेच नव्हे तर उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या चेहऱ्यांनाही विधान परिषदेची संधी दिली. मात्र, पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी या उमेदवारीवर भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्या मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत केंद्राचं काही वेगळं प्लानिंग असेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या सूचक विधानामुळे पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सूचक विधान केलं. आमच्या पक्षात सर्वजण कोरी पाकिटं असतो. जो पत्ता लिहिला जाईल तिथे जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याने, त्याच्या चाहत्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना करत असते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेचा निर्णय केंद्र करत असते. केंद्राने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध नेत्याने मान्य करायचा असतो. पंकजाताईंना उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काही विचार केला असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पंकजा मुंडे या राष्ट्रीय सचिव आहेत. मध्यप्रदेशच्या प्रभारी आहेत. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत. केंद्राला त्यांच्या बद्दल भविष्यात मोठी अपेक्षा असेल किंवा मोठं प्लानिंग असेल. त्यांच्याबाबत केंद्राने काही वेगळा विचार केला असेल, असं पाटील म्हणाले.
काही दिवसांपूर्वी भाजपने राज्यातील मराठा आणि ओबीसी नेत्यांचं केंद्रात पुनर्वसन केलं आहे. विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस केलं. पंकजा मुंडे यांनाही राष्ट्रीय सरचिटणीस केलं. राष्ट्रीय स्तरावर या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचं भाजपचं धोरण दिसतंय. भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजपकडे असंख्य नेते आहेत. प्रत्येकाला विधान परिषदेवर सामावून घेणं शक्य नाही. काही लोकांना केंद्रात पाठवून संघटनेची जबाबदारी द्यायची आणि येणाऱ्या काळात त्यांचं चांगलं पुनर्वसन करायचं हे या मागचं भाजपचं गणित दिसतंय, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.