पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आज पिंपरीत आमने-सामने आले. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हस्तांदोलन करत एकमेकांना सदिच्छा दिल्या. पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या भेटीची मावळ लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली.
राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. कुठे प्रचाराचा धुरळा उडतोय, तर कुठे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येत शक्तिप्रदर्शन केले जात आहे. अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं.
मावळचे दोन्ही उमेदवार म्हणजे पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बारणे आणि पार्थ अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना, एकमेकांसोर आले. त्यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि सदिच्छाही दिल्या. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, अमर साबळे, आमदार बाळा भेगडे इत्यादी नेते उपस्थित होते.
मावळमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे अशी तगडी लढत होणार आहे. एरवी श्रीरंग बारणेंसाठी सहज विजयाची असणारी ही निवडणूक पार्थ पवारांच्या एन्ट्रीने आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारालाही वेगळी रंगत चढली आहे. याच दरम्यान दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांच्या समोर येऊन हस्तांदोलन करतात, हे पाहून वैचारिक परिपक्वता दिसून आली.