मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला चारी मुंड्या चित केलं. भाजपने एकूण 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीला धूळ चारलीय. या विजयामुळे भाजपला बळ आलं असून शिवसेनेसाठी ही चपराक असल्याचं म्हटलं जातंय. भाजपच्या या यशामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दिसत आहे. तर वाघ या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करु पाहतोय. मात्र मंत्री नारायण राणे वाघाला त्याची शेपटी धरून बाहेर फरफटत नेत असल्याचं दिसतंय. या वाघाला राणे बँकेपर्यंत पोहोचू देत नसल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलंय. या फोटोच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असून सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रभर हा फोटो व्हायरल होतोय. कोणताही शब्द न वापरता शिवसेनेला खिजवण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
ही निवडणूक फक्त एका जिल्हा बँकेपुरती असली तरी नारायण राणे आणि शिवसेना वाद अशी किनार या निवडणुकीला होती. याच एका कारणामुळे या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या निडणुकीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असेलले सतीश सावंत याचा पराभव झाला. तसेच सिंधुदुर्ग भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यातील लढत तर विशेष ठरली. या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे साडेतीन वर्षाच्या मुलाकूडन चिठ्ठी काढून विजयी उमेदवार ठरवण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत यांचा पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई विजयी झाले.
दरम्यान, याआधीदेखील नितेश राणे यांनी सतीश सावंत आणि त्यांच्या स्वत:चा एक फोटो समाजमाध्यमावर अपलोड केला होता. या फोटोमध्ये नितेश राणे सीतश सावंत यांच्या अंगावर पाय देऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले होते. तर बाजूला गाडलाच असे लिहून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या निवडणूक पार पडली आहे. निकालही स्पष्ट झाले आहेत. मात्र राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाहीये.
इतर बातम्या :