पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कल्याणमध्ये सभा पार पडली. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज कल्याणमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. “आजही काँग्रेस आणि इंडिया आघाडी तृष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचं लक्ष एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणावर आहे. त्यांनी प्रयोग सुरु केला आहे. कर्नाटकात त्यांनी त्याची लॅबोरेटरी बनवली आहे. कर्नाटकात जितके मुसलमान होते, त्यांनी रातोरात हुकूम काढला की, सर्व मुसलमान ओबीसी आहेत. ओबीसींच्या कोट्यातील खूप मोठी लूट केली. आरक्षणाची हीच लूट काँग्रेस संपूर्ण देशात करु इच्छित आहे”, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
“एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाचे तुकडे करुन कुणाला देतील? ते ज्यांच्याकडून व्होट जिहाद करायची बात करत आहेत, तुम्ही मला सांगावं, इंडिया आघाडीच्या एका तरी नेत्याने विरोध केला का? मोदी बोलतो तर मोदी हिंदू-मुसलमान करतो. पण मोदी ते करत नाही तर मोदी त्यांच्या हिंदू-मुसलमानचा खेळ समोर आणत आहे. माझ्यासाठी माझ्या छवीपेक्षा हिंदुस्तानची एकता माझी प्राथमिकता आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“काँग्रेस कधीही विकासाची बात करु शकत नाही. काँग्रेसला केवळ हिंदू-मुसलान करणं माहिती आहे. त्यांच्यासाठी विकासाचा अर्थ हा फक्त त्या लोकांचा विकास जे त्यांना मत देतात. काँग्रेस कशाप्रकारे हिंदू-मुसलमान करते, आणि मी नेहमी त्याचा खुलासा करतो, मी यांची बेईमानी बाहेर आणतो तेव्हा त्यांची इको सिस्टीम ओरडायला लागते. ते म्हणतात, मोदी हिंदू-मुसलमान वाद आणतात. अरे मोदी हिंदू-मुसलमानच्या नावाने देशाला तोडणाऱ्यांचा खुलासा करत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“मी उदाहरण देऊ इच्छितो आणि या उदाहरणाची इतिहासात नोंद आहे. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं. आपल्या आई-वडिलांना आठवण्यासाठी अल्बम उघडावं लागतं का? पण यांची अवस्था अशी आहे की, त्यांना आपल्या आई-वडिलांना आठवण्यासाठी अल्बम उघडावं लागतं. काँग्रेस आपल्या सरकारच्या काळात उघडपणे म्हणत होती की, देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. हे डॉक्टर मनमोहन सिंह यांनी सांगितलं होतं. मी तिथे उपस्थित होतो. मी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.