पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं सेवा व समर्पण अभियान, विविध सेवा कार्यक्रमांचं आयोजन

| Updated on: Sep 16, 2021 | 4:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भाजपकडून राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं सेवा व समर्पण अभियान, विविध सेवा कार्यक्रमांचं आयोजन
Narendra Modi
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भाजपकडून राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सचिव संदीप लेले, दिव्या ढोले, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उत्तर भारतीय मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी यावेळी उपस्थित होते. (BJP launches service and dedication campaign on the occasion of PM Narendra Modi’s birthday)

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा आणि समर्पण अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब वर्गाची सेवा करण्याचा विचार प्रत्यक्षात आणला आहे, असं पुरोहित आणि उपाध्ये म्हणाले.

सेवा आणि समर्पण अभियानात सेवा कार्यक्रमांवर भर

सेवा आणि समर्पण अभियानात सेवा कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे. प्रत्येक मंडलात दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरण यांचे वितरण करणे, प्रत्येक जिल्ह्यातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये व वृध्दाश्रमांना भेट देऊन फळांचे वाटप करणे, जिल्हा/मंडल स्तरावर आरोग्य तपासणी शिबिर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन किटचे वितरण, रक्तदान शिबिर, सर्व मंडलांमध्ये स्वच्छता कार्यक्रम, प्लास्टिक निर्मूलन मोहिम असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या खेरीज विविध स्वरूपाचे सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या नात्याने जनसेवक म्हणून 20 वर्ष पूर्ण करत आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. या अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये सेवा कार्याचे महत्व व राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत करायची आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पीएम केअर्समधून साह्य देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मोदी सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा प्रसार या अभियानात केला जाणार आहे. मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या नागरिकांशी संपर्क साधला जाणार आहे, असंही पुरोहित यांनी सांगितलं.

भाजपचं ‘सेवा आणि समर्पण अभियान’

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी अलिकडेच एका बैठकीत हे अभियान कसं असेल हे सांगितलं होतं. त्यातले प्रमुख मुद्दे असे-

1.पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या 14 कोटी राशन बॅग वाटण्यात येतील. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 5 किलो राशन ह्या बॅगेत असेल. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यात आतापर्यंत 2.16 कोटी बॅग वाटण्यात आल्यात.

2. कोरोना महामारीच्या काळात मोदींची मदत झाली, त्यामुळे त्यांना धन्यवाद देणारे व्हिडीओ दाखवले जाणार. यात गरीबांचे मसिहा मोदीजी असा संदेश असेल.

3. देशभरातून बूथ लेवलवरुन थँक्यू मोदीजी असं लिहिलेलं 5 कोटी पोस्टकार्ड त्यांना पाठवले जातील.

4. मोदींचा हा 71 वाढदिवस आहे, त्यामुळे 71 ठिकाणी नद्यांची साफसफाई अभियान राबवलं जाईल.

5. ज्यांना कोरोनाची लस दिली गेलीय, त्यांनी थॅक्यू मोदीजी म्हटलेले व्हिडीओ प्रसारीत केले जातील.

6.मोदींच्या राजकीय प्रवासावर व्हिडीओ दाखवला जाईल. राज्य आणि जिल्हा स्तरावर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. सेमिनारही असतील.

7. प्रसिद्ध लेखक, कवी यांच्याकडून मोदींची स्तुती करणारं साहित्य उपलब्ध केलं जाईल. यात प्रादेशिक भाषेतले लेखकही असतील.

8. कोरोनाकाळात जी मुलं अनाथ झालीत, त्यांना पीएम केअर फंडातून मदत देण्यासाठी नोंदणी अभियान चालवलं जाईल.

9. पंतप्रधान मोदींना अनेक सन्मानचिन्हं आणि प्रतिमा मिळालेल्या आहेत, त्याच्या निलामीबद्दल लोकांना सांगितलं जाईल.

10. वृद्धांना भोजन वाटप, त्यांच्या प्रकृतीची मोफत तपासणी, ब्लड डोनेशन कँप याचेही आयोजन केलं जाईल.

11. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती तर 25 सप्टेंबरला दीनदयाल उपाध्याय जयंती आहे. भाजप कार्यकर्त्यांना बूथ लेव्हलवर ह्या दोन दिवशी रचनात्मक कार्य करायला सांगितलं जाईल.

इतर बातम्या :

Nitin Gadkari : पत्नीला न सांगता जेव्हा सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला! नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार, विरोधासाठी मनसेनंही दंड थोपटले!

BJP launches service and dedication campaign on the occasion of PM Narendra Modi’s birthday