उद्धव ठाकरेला ओळखा, हा कपटी माणूस, नरेंद्र मोदींच्या मदतीच्या वक्तव्यानंतर भाजपा आमदाराचं मत

| Updated on: May 03, 2024 | 1:25 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची TV9 ने नुकतीच मुलाखत घेतली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ठाकरे कुटुंबाबरोबर असलेल्या राजकारणापलीकडच्या संबंधांचा उलगडा केला.

उद्धव ठाकरेला ओळखा, हा कपटी माणूस, नरेंद्र मोदींच्या मदतीच्या वक्तव्यानंतर भाजपा आमदाराचं मत
Uddhav Thackeray-PM Modi
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे कुटुंबाबरोबर असलेल्या राजकारणापलीकडच्या संबंधांचा उलगडा केला. “बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन” असं पंतप्रधान मोदी या मुलाखतीत म्हणाले. “बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या”, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत राजकारणापलीकडचे पदर उलगडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे जे सांगितलं, त्यानंतर आता त्यावर वेगवेगळी मत व्यक्त होतं आहेत, प्रतिक्रिया येत आहेत.

‘उद्धव ठाकरे आज आमदार आहेत ते मोदीजींमुळे’

कणकवलीचे आमदार आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणाच्या पलीकडे संबंध जोपासले जातात. उद्धव ठाकरे एक असा व्यक्ती आहे, ज्याने द्वेषाच राजकारण महाराष्ट्रात सुरु केलं. मोदीजींनी जे सांगितलं ते सत्य आहे. एवढा विरोध करुन त्यांची तब्येत खराब झाली तेव्हा मोदींनी त्यांची चौकशी केली, हे आम्ही ऐकलेलं” असं नितेश राणे म्हणाले. “हे कशाला, एवढा विरोध करुन पण उद्धव ठाकरे आज आमदार आहेत ते मोदीजींमुळे. कोरोना काळात निवडणूक प्रक्रिया झाली. हेच उद्धव ठाकरे राज्यपालांकडे गेले, तिथून त्यांनी मोदीजींना फोन केला, तेव्हा हे आमदार झाले. राजकारणापलीकडे नातं कसं टिकवायचं हे मोदींकडून शिकलं पाहिजे” असं नितेश राणे म्हणाले.

‘हा कपटी माणूस’

“बाळासाहेबांच्या जिवाला अतिरेक्यांपासून धोका होता, तेव्हा राणे साहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता त्यांचं संरक्षण केलं. त्याच राणेसाहेबांना मारुन टाकण्याची सुपारी देणारा हा उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेला ओळखलं पाहिजे, हा कपटी माणूस आहे” असं नितेश राणे म्हणाले.