महाराष्ट्राती सध्याचं वातावरण फार वेगळं आहे. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रासाठी ही निवडणूक वेगळी आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष हा भाजपसोबत तब्बल अडीच दशक युतीत होता. शिवसेना आणि भाजप यांची तुटी तुटेल? याची महाराष्ट्राच्या जनतेला कल्पना नव्हती. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना महायुतीबाबतचा असा विचार कुणाच्याही मनात आला नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधन नंतर काही वर्षांनी महायुतीत अशा घडामोडी घडल्या ज्यामुळे शिवसेना आणि भाजपात दुरावा आला. आता तर बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधत बनले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलताना भावूक झाले.
“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहील”, असं म्हणत नरेंद्र मोदी भावूक झाले.
“मलाही वाटतंय यावेळी ही इमोशनल परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांच्या सन्मानासाठी जी शिवसेना काम करत आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ती आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“ज्या कालखंडात ज्यांनी सरकार चालवलं. सर्व कामे बाळासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात होते. औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा बसतो याचा प्रचंड राग महाराष्ट्राच्या मनात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बसल्यावर लोकांना राग येतो. लोक म्हणतात, बाळासाहेबांनी तर आम्हाला हे सांगितलं होतं. त्याच्या मुलांमध्ये सत्तेची लालसा अशी आली. त्यामुळे इमोशन्स आमच्याबाजूने आहेत. तर राग त्यांच्या विरोधात आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल. हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा. झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळतील. सर्व इमोशन आमच्या बाजूने आहे”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.