PM Modi in Vidarbha : भाजपाची सर्वाधिक भिस्त विदर्भावर का? म्हणून पीएम मोदींचा आजचा वर्धा दौरा खूप महत्त्वाचा

| Updated on: Sep 20, 2024 | 12:01 PM

PM Modi in Vidarbha : विदर्भ राजकीय दृष्ट्या भाजपासाठी इतका महत्त्वाचा का आहे? विदर्भाच्या राजकारणात कुठले मतदार निर्णायक भूमिका बजावतात? विदर्भात लोकसभेच्या-विधानसभेच्या किती जागा आहेत? विदर्भाचा सध्या कौल काय आहे? म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: विदर्भाच्या मैदानात उतरले आहेत.

PM Modi in Vidarbha : भाजपाची सर्वाधिक भिस्त विदर्भावर का? म्हणून पीएम मोदींचा आजचा वर्धा दौरा खूप महत्त्वाचा
PM Modi in Vidarbha
Follow us on

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. विदर्भ हा काँग्रेस आणि भाजपा दोघांचा गड मानला जातो. यंदा काँग्रेसला विदर्भाकडून भरपूर अपेक्षा आहेत. आणीबाणीच्या काळातही विदर्भातील जनतेने काँग्रेसला साथ दिली होती. भाजपाने मागच्या दहा वर्षात विदर्भात आपली पाळमुळं भक्कम करण्याचा प्रयत्न केला. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या हातून हा किल्ला निसटण्याचे संकेत मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी भाजपासाठी विदर्भातील समीकरण जुळवून आणण्यासाठी स्वत: पीएम मोदी विदर्भाच्या मैदानात उतरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात वर्धा येथे एका मोठ्या जनसभेला संबोधित करणार आहेत. पीएम मोदी ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तिथे योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि लोन देण्यात येईल. त्याशिवाय पीएम मोदी आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजना सुरु करतील. वर्ध्यातून विकास योजना सुरु करुन राजकीय समीकरण साध्य करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

कुठले शेतकरी भाजपावर नाराज?

मागच्या दहा वर्षात भाजपाच विदर्भात चांगलं प्रदर्शन राहिलं आहे. पण 2024 लोकसभा निवडणुकीनंतर समीकरण बदललय. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज असल्याच दिसतय. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या NDA आघाडीला विदर्भात फटका बसला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने विदर्भात घवघवीत यश मिळवलं होतं.

लोकसभेला विदर्भात भाजपाला किती नुकसान झालं?

2024 लोकसभा निवडणुकीत विदर्भातील लोकसभेच्या 10 जागांपैकी अवघ्या दोन जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. काँग्रेसने पाच जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या एनसीपी (एस) ने एक जागा जिंकली. भाजपाचा सहकारी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक खासदार निवडून आला. 2019 च्या तुलनेत काँग्रेसने 4 जागा जास्त जिंकल्या. भाजपाला तीन आणि शिंदेंच्ंया शिवसेनेच दोन जागांवर नुकसान झालं.

भाजपासाठी हा एक मोठा झटका

विदर्भाने भाजपाच टेन्शन वाढवलं आहे. काँग्रेसला आशेचा किरण दिसतोय. भाजपाला काही नेते सोडचिठ्ठी देतायत. विदर्भातील दिग्गज नेते गोपाळदास अग्रवाल यांनी भाजपासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. भाजपासाठी हा एक मोठा झटका आहे. म्हणूनच पीएम मोदी स्वत: मैदानात उतरलेत. वर्ध्यातून विदर्भाच्या जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आहे.

2019 मध्ये विदर्भात भाजपाला पहिला मोठा धक्का

विदर्भावर पकड मजबूत करण्यासाठी भाजपाने इथे जातीय समीकरण साधण्याचाही प्रयत्न केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणूक निकालात ते दिसून आलं. विदर्भातून विधानसभेच्या 62 जागा येतात. त्यात 44 जागा भाजपाने जिंकल्या. शिवसेना 4, काँग्रेस 10, एनसीपी 1 आणि अन्यना 4 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विदर्भातून 29 जागा जिंकल्या. शिवसेनेने चार जागांवर विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसला 15 आणि एनसीपीला 6 जागा मिळाल्या. अन्यनी 8 जागा जिंकल्या.

भाजपासाठी विदर्भ महत्त्वाचा का?

महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भाच स्थान नेहमी महत्त्वाच राहिलं आहे. स्वातंत्र्यकाळापासून विदर्भावर काँग्रेसची पकड होती. इथे स्वत:ची पाळमुळं रोवण्यासाठी भाजपाला मोठा संघर्ष करावा लागला. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर हे विदर्भातील मोठ शहर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच मुख्यालय नागपूरमध्ये आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून येतात. भाजपासाठी विदर्भाच राजकीय महत्त्व खूप आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच विदर्भातून येतात.

विदर्भात कुठल्या मतदारांची भूमिका निर्णायक?

विदर्भाच राजकारण शेतकरी, दलित आणि आदिवासी मतदार ठरवतात. विदर्भात दलित समुदाय मोठ्या संख्येने आहे. दलित मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी पक्षांचा मोठा जनाधार विदर्भात आहे. विदर्भातील अनेक जागांवर दलित मतदार 23 ते 36 टक्क्यांच्या घरात आहे. रामदास आठवले यांना सोबत ठेवण्याचा भाजपाला काही प्रमाणात फायदा होतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षण हे मुद्दे उचलले. या दोन मुद्यांच्या आधार दलित समुदायाला आपल्यासोबत आणण्यात ते यशस्वी ठरले. याच आधारावर निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्लान आहे.