नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपला सर्वात मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे या तीन राज्यांमध्ये भाजपचं एकहाती सत्ता बनण्याची शक्यता आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. भाजपकडून विजयानंतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात संबोधित केलं. यावेळी त्यांनी पहिल्याच वाक्यात काँग्रेसला टोला लगावला. त्यांनी भारत माता की जय घोषणा केली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील घोषणाबाजी केली. यावेळी ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले की, इतकं जोराने बोला की, आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे. कारण भाजपला तेलंगणा वगळता इतर तीनही राज्यांमध्ये यश आलं आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा समावेश आहे.
“आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे… भारत माता की… भारत माता की… आजचा विजय ऐतिहासिक आहे. अभूतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासाची भावना विजयी झालीय. आज विकसित भारताच्या आवाहानाचा विजय झालाय. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला. आज वंचितांना पुढे आणण्याच्या विचाराचा विजय झाला. आज भारताच्या विकासासाठी राज्याच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला. आज इमानदारी, पारदर्शिकता आणि सुशासनचा विजय झालाय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सुरुवातीला म्हणाले.
“मी या मंचावरून सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन करतो. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपावर प्रेम दाखवलं आहे. तेलंगणातही भाजपाला पाठिंबा वाढत आहे. आपल्या कुटुंबाला एवढं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, त्यामुळे मी व्यक्तिगतरित्या अनुभव करतो की माझी जबाबदारी अधिक वाढते. आज सुद्धा माझ्या मनात हीच भावना आहे. मी आपल्या आई, बहीण, मुली आणि युवा साथी, शेतकरी आणि गरीब कुटुंबांच्या समोर त्यांनी जो निर्णय घेतला. आपल्याला समर्थन दिलं. त्याबद्दल मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोय”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.