मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यासाठी गुरुवारी दाखल झाले. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ आणि भूमिपूजनही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल असल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सुरुवातीला ते दाखवून दिले. फडणवीस यांचे भाषण मुंबई केंद्रीत होते. मुंबई शहराचे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कसा भकास केला हेच आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले. फडणवीसांचे संपुर्ण भाषण मुंबई केंद्रीत होते तर एकनाथ शिंदे यांनी दावोसपासून राज्यापर्यंतचा सर्वच उल्लेख केला. अर्थातच मुंबई महानगरपालिकेत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काय घोळ केले? हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाही. म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामाध्यमातून मुंबई महानगरपालिका निवडणुकेचे रणशिंग फुंकले.
मुंबईचे समुद्रात जाणारे पाणी व तीन वर्ष मिळालेले दूषित पाणी, रस्त्यांवरील खड्डे, धारावीचा पुर्नविकास, फेऱ्यावाल्यांना देण्यात येणारे कर्ज असे मुंबईशी संबंधित अनेक विषयांना फडणवीस यांनी हात घातला. रखडलेले प्रकल्पाचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोले लगावले. त्यांनी स्वत: ची पोळी भाजण्यासाठी मुंबईचा विकास वर्षनुवर्ष रोखून धरल्याचा आरोप केला.
फडणवीस यांचे भाषण मुंबईचा विकास आणि महानगरपालिकेचे अपयश यांच्यावर होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक जिंकण्यात आता कोणतीही कसूर भारतीय जनता पक्ष व शिंदे गट सोडणार नाही, हे दाखवून दिले.
शिंदेंना हवे ट्रिपल इंजिन :
राज्यातील डबल इंजिन सरकार अडीच वर्षापुर्वीच आले असते. परंतु काही जणांमुळे ते आले नाही. आता शिंदे यांच्यांमुळे ते आल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. आता डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिन सरकार आणायचे असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी आपले इरादे स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारसोबत आता मुंबई महानगरापालिकेतही आपलीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी केला. शिंदे यांनी आपल्या भाषणात मोदी यांचे कौतूक करत त्यांचा करिश्मा जागतिक स्तरावर कसे आहे, हे सांगितले.