वाराणसी (उत्तर प्रदेश) : भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय राय यांना तब्बल 3 लाख 85 हजार मतांनी पराभव केला.
नरेंद्र मोदी हे सलग दुसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात उतरले होते. गेल्यावेळी म्हणजे 2014 साली गुजरातमधील बडोदा आणि वाराणीसीतून लढले होते. दोन्ही ठिकाणाहून मोदी जिंकले होते. यंदा मोदींनी केवळ वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
वाराणसीतून अजय राय यांच्यासाठी काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला होता. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या स्वत: वाराणसीत अजय राय यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या.
वाराणसीतून अर्ज भरण्यासाठी मोदींकडून चार प्रस्तावक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज भरण्यासाठी प्रस्तावक म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील चौघांचा समावेश होता. दन मोहन मालवीय यांच्या दत्तक कन्या अन्नपूर्णा शुक्ला, डोमराज कुटुंबातील जगदीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गुप्ता आणि कृषी शास्त्रज्ञ राम शंकर पटेल यांचा समावेश आहे.
वाराणसीत 2014 साली काय चित्र होतं?
2014 सालीही नरेंद्र मोदी यांना काँग्रेसकडून अजय राय यांनीच आव्हान दिले होते. मात्र, त्यावेळी अजय राय हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहिले होते. मोदींनी 2014 साली 3 लाख 71 हजार 784 मतांनी विजय मिळवला होता.
कोण आहेत अजय राय?
अजय राय हे उत्तर प्रदेश विधानसभेत पाच वेळा निवडून गेले आहेत. अजय राय हे भाजपच्या तिकीटावर कोलासला विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून गेले. 1996 ते 2007 दरम्यान ते भाजपमध्ये होते. अजय राय 2009 मधील पोटनिवडणुकीत अपक्ष लढले आणि चौथ्यांदा आमदार झाले.
भाजपने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिकीट न दिल्याने त्यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजपने मुरली मनोहर जोशी यांना तिकीट दिलं होतं. 2009 मध्ये अजय राय समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढले, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 2012 मध्ये पिंडरा विधानसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
2014 मध्ये काँग्रेसकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला. 2017 मध्ये पिंडरा विधानसभा काँग्रेसकडूनच लढववली, मात्र त्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.