नवी मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. या अपघातात त्यांचा चालक आणि बॉडीगार्ड जखमी झाला आहे. हा अपघात अतिशय भीषण होता. अपघात झाल्यानंतर मेटे यांच्या चालकाने रस्त्यावरील वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्यांना मदत केली नाही. रस्त्यावर झोपलो तरीही वाहने थांबली नाही. पोलिसांच्या 100 क्रमांकावर नंबर फिरवला, त्याचाही उपयोग झाला नाही. तासभर आम्हाला मदत मिळालीच नाही, असा आरोप मेटेंच्या चालकाने केला आहे. तर, आम्हाला अपघाताची (accident) माहिती मिळताच अवघ्या सात मिनिटात आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या (police) प्रेस रिलीजमध्ये तसं नमूद केलं आहे. मात्र, पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी मेटे यांच्या कारचा अपघात झाल्याचंही पोलिसांच्या प्रेस रिलीजमध्ये नमूद केलं आहे.
विनायक मेटे यांच्या कारला आज पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी अफघात झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. आम्हाला अपघाताची माहिती 5 वाजून 58 मिनिटांनी मिळाली. माहिती मिळताच त्याचवेळी म्हणजे पहाटे 5 वाजून 58 मिनिटांनी आम्ही घटनास्थळाकडे रवाना झाला. तसेच 6 वाजून 5 मिनिटांनी आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि 7 वाजून 10 मिनिटांनी कार्यवाही केली, असं पोलिसांच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी अपघाताबाबतची माहिती दिली आहे. विनायक मेटे हे मुंबईच्या दिशेने दुसऱ्या लेनने जात असताना कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्सने कामोठ्याच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉ.धर्मांग यांनी तपासून मेटे यांना मयत घोषित केले आहे. बॉडीगार्ड व पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने त्यांना कारमधून बाहेर काढून एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे 5 वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.