भोपाळ (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रोड शोमध्ये मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कम्प्युटर बाबाही सहभागी झाले होते. या रोड शोच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस सिव्हिल ड्रेसववर होते. मात्र, धक्कादायक म्हणजे, या पोलिसांच्या गळ्यात भगवं उपरणं होतं.
यातील एका महिला पोलिसाने एनएनआय या वृत्तसंस्थेशी भगव्या उपरण्याबाबत बोलताना सांगितले, “आमच्याकडून असे करुवून घेतले जात आहे.” यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण तापलं आहे. आधीच पोलिस सिव्हिल ड्रेसवर, त्यात गळ्यात भगवं उपरणं, यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भोपाळ लोकसभा मतदारंसघात 12 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. भोपाळमधून काँग्रेसकडून वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, तर भाजपकडून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर रिंगणात आहे.
Bhopal: Police personnel in civil uniform seen wearing saffron scarves at the roadshow of Computer Baba and Digvijay Singh (Congress candidate from the Lok Sabha seat); a policewoman says “we’ve been made to wear this”. #MadhyaPradesh pic.twitter.com/RN8UUN2oMC
— ANI (@ANI) May 8, 2019
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या हिंदुत्त्ववादी चेहरा मानल्या जातात. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी दिग्विजय सिंहही मागे राहिले नाहीत. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कॉम्प्युटर बाबांसह अनेक साधूबाबांना घेऊन दिग्विजय सिंह यांनी प्रचाराचा रोड शो केला. यावेळी दिग्विजय यांनी पत्नीसह होमहवनही केलं.
दुसरीकडे, काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात प्रचारासाठी आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही भोपाळमध्ये येणार आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते असेलेल्या दिग्विजय सिंह विरुद्ध मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लढाई अत्यंत चुरशीची झाली आहे.