आघाडीत विसंवाद? सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री अंधारात? राऊत-वळसे पाटील नेमके काय म्हणाले?

| Updated on: Sep 20, 2021 | 8:07 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या कारवाईवरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचं दिसून आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं म्हणत कारवाईचं खापर राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यावर फोडलं आहे. (kirit somaiya)

आघाडीत विसंवाद? सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री अंधारात? राऊत-वळसे पाटील नेमके काय म्हणाले?
political leader
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या कारवाईवरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचं दिसून आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं म्हणत कारवाईचं खापर राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यावर फोडलं आहे. तर, पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना कारवाईबाबत ब्रिफिंग दिलं की नाही माहीत नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचं बोललं जात असून सोमय्यांचा धसका घेतल्यानेच आघाडीतील नेते कारवाईवरून हात झटकत असल्याचं सांगितलं जात आहे. (politics over action against kirit somaiya, know maha vikas aghadi leaders reaction)

राऊत यांनी काय म्हटलं होतं?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना या कारवाईवरून हात झटकला होता. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय त्यामागे केंद्र सरकार आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्राच्या पाठबळावर राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा विरोधी पक्षांचा उपक्रम आहे. त्याला धंदा म्हणणार नाही, असं सांगतानाच आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली आहे. ती गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्यात आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. मी सकाळी पूर्ण माहिती घेतली. गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही बाजूने काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं म्हणून ही कारवाई झाली. त्यात मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली म्हणून त्याकडे पाहू नये. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी अशा प्रकारचे खोटेनाटे आरोप केले, बुडबुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही हे आम्हाला माहीत आहे, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या कार्यालयाचा संबंध नाही

सोमय्यांनी केंद्रसरकारवर बोलावं. इतर राज्यातील भाजपची सरकारं आहेत. त्यावर बोलावं. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, यंत्रणा आहेत, लाचलूचपत विभाग आहे. या संस्था पक्षपात न करता काम करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांवर आरोप करत आहात. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न होत असेल तर राज्याचं गृहमंत्रालय कारवाई करत असतं. कालपासून मी पाहतो ही राज्याच्या गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. गृहमंत्रालयाला काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असंही राऊत यांनी सांगितलं.

वळसे-पाटील काय म्हणाले?

दिलीप वळसे-पाटील यांनीही यावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नॉर्मली अशी घटना घडते तेव्हा वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना ब्रिफिंग करतात आणि मुख्यमंत्र्यांनाही ब्रिफिंग करत असतात. मात्र या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग केलं की नाही केलं मला माहिती नाही, असं सांगतानाच कालच्या घटनेशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. कारवाईचा जो काही निर्णय आहे, तो गृहमंत्रालयाने घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

शिवसेनेची भूमिका हस्यास्पद

हा समन्वयाचा थेट अभाव आहे. टीव्हीवर 24 तास दाखवत होते. संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण गाजवलं जात होतं. तरीही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली नाही किंवा त्यांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य आहे. खरं तर सोमय्या आणि शिवसेना यांची ही लढाई मुख्य आहे. शिवसेनेमुळेच सोमय्यांचं तिकीट कापलं होतं. अशावेळी गृहमंत्रीच सर्व करत आहेत, असं म्हणणं हस्यास्पद आहे. सोमय्या आणि शिवसेनेचा मोठा संघर्ष आहे. सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्लाही केला होता. त्यामुळे कालचं प्रकरण मुख्यमंत्र्यांना माहीतच नव्हतं, असं म्हणणं पटणारं नाही, असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलं.

पालक म्हणून जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच

शिवसेना नेहमी म्हणते आम्ही समोरून वार करतो. हा समोरून वार अजिबात दिसत नाही. उलट आम्ही केलं असेल तर आम्ही जबाबदारी स्वीकारतो, असं ते नेहमी म्हणतात. मग या प्रकरणात ते असं का करत आहेत? कारवाई कुणीही करो, शेवटी जबाबदारी पालक म्हणून सीएमकडे जाते. अनेकदा मुख्यमंत्री कामांचं क्रेडिट घेत असतातच ना. आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून या प्रकरणाशी आमचा संबंध नाही हे दाखवण्याचा प्रकार आहे. आमची जबाबदारी आहे, हे त्यांनी सांगायला हवं होतं, असंही देसाई म्हणाले.

शिवसेना सेफ मोडमध्ये

महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही. अनिल देशमुख प्रकरणात सगळं खापर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवर फुटलं. पण त्या सर्वात मोठा रोल होता तो अनिल देशमुखांचा. तीच वेळा पुन्हा मुश्रीफांच्याबाबत मुख्यमंत्र्यांवर येऊ नये. शिवसेनेच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून शिवसेना सेफ मोडमध्ये काम करत आहे. त्यांना राष्ट्रवादीसोबत सत्ता हवी आहे. पण राष्ट्रवादीकडून सत्तेचा जो काही दुरुपयोग होत आहे, त्याचं कोणतंही बालंट अंगावर येऊ नये म्हणून मुख्यमंत्री काळजी घेत आहेत, असं ‘आपलं महानगर’चे ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील जावडेकर यांनी सांगितलं.

सोमय्यांना अंगावर घ्यायचे नाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काही केलं तरी त्यासोबत मुख्यमंत्री असणार नाहीत हा संदेशही त्यांनी देऊन टाकला आहे. भाजपकडून महाविकास आघाडीवर जो काही हल्ला होऊ शकतो. त्यात मुख्यमंत्री किंवा शिवसेनेवरील हल्ला तीव्र होणार नाही. त्याची शिवसेना काळजी घेत आहे. शिवाय सोमय्यांचा धसकाही शिवसेनेला आहेच. उद्धव ठाकरेंना सोमय्यांना अंगावर घ्यायचे नाही. त्यामुळे सेना सध्या सावध पवित्र्यात आहेत, असंही जावडेकर म्हणाले. (politics over action against kirit somaiya, know maha vikas aghadi leaders reaction)

 

संबंधित बातम्या:

सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन कटणाऱ्याप्रमाणे; सुप्रिया सुळे यांची बोचरी टीका

VIDEO: मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया, सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?

गडहिंग्लज आणि पारनेर कारखान्यात घोटाळा, उद्या ईडीला पुरावे देणार; किरीट सोमय्यांची माहिती

(politics over action against kirit somaiya, know maha vikas aghadi leaders reaction)