मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 35 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहान केले. तुम्ही समोर या आणि मला सांगा मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नकोय, मी राजीनामा देतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आवाहानानंतर आता बॅनरबाजीला जोर चढला आहे. पालघर, ठाणे, डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागपुरात शिवसैनिकांनी एकत्र येत उद्धव ठाकरेंना समर्थन दिले आहे. तसेच त्यांचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे यासाठी जवळपास 40 आमदारांसह बंडाचा पवित्रा घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पालघर जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात समर्थन मिळताना दिसत आहे. शिंदे यांच्या समर्थनासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू, चारोटी,कासा या परिसरासह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठया प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर ” लोकांचा लोकनाथ एकनाथ” आणि ” साहेब आगे बढो हम आप के साथ है” असा मजूकर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
तर दुसरीकडे नागपुरात मात्र शिवसौनिक आक्रमक झाले असून, ते शिवसेनेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. सोबत उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. आम्ही तुमच्या सोबत असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांची संख्या वाढत असल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडण्यात यावी अशी प्रमुख अट एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर ठेवली आहे. तर दुसरीकडे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांना भावनिक आवाहान केले आहे.