प्रमोद महाजन यांनी बातमी फोडली अन् भाजप-राष्ट्रवादीची युती बारगळली; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 01, 2023 | 9:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कर्जतमध्ये दोन दिवसाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याचा कार्यक्रमाला आज सांगता झाली. या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीबाबत अतिशय मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची 2004 मध्येच युती होणार होती. पण प्रमोद महाजन यांनी बातमी फोडल्यामुळे ही युती होऊ शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केलाय.

प्रमोद महाजन यांनी बातमी फोडली अन् भाजप-राष्ट्रवादीची युती बारगळली; प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट
praful patel
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अक्षय मंकणी, Tv9 मराठी, रायगड (कर्जत) | 30 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाकडून कर्जतमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. दोन दिवस झालेल्या मेळाव्याची आज सांगता झाली. या मेळाव्यात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रवाहासोबत चालणारे नेते आहेत, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीची युती ही 2004 मध्येच होणार होती. पण भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना याबाबतची माहिती दिली आणि युती बारगळली, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

“2 जुलैला आपण सत्तेवर आलो. आपण जे पाऊल टाकलं ते पक्षाचा हितासाठी टाकलं आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी मी माझी बाजू मांडेल. इथे मंत्री दिलीप वळसे पाटील देखील बसले आहेत. त्यांच्या देखील पोटात खूप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत. आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभांपर्यंत नाही. आपल्याला पुढील 20 ते 25 वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वखाली काम करायचं आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

“2004 साली राष्ट्रवादी नुकतीच जन्माला आली होती. त्यावेळी 16, 16, 16 करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या घरी मीटिंग झाली होती. स्वतः भाजप नेते प्रमोद महाजन माझ्या घरी होते. भाजचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार हे झालं होतं. त्यावेळी प्रमोद महाजन यांना लक्षात आलं की, आपलं दिल्लीतल महत्त्व कमी होईल त्यामुळे त्यांनी बळासाहेब ठाकरे यांना माहिती लीक केली आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी आडवी तिडवी टीका केली आणि होणारी युती होऊ शकली नाही”, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला.

“मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1986 मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले. आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत. अजित पवार यांना हे भेकड म्हणतात. त्यांना सांगतो, राज्यात जो कोणी मर्द असेल तर ते एकमेव अजित पवार आहेत”, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

“अजित पवार यांचे चांगले आणि गोड संबंध होते. मात्र जवळ नव्हते कारण मी शरद पवार यांच्या जवळ होतो. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत मी गेलो. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की अजित पवार यांच्यासोबत कसं काय? अनेकांना वाटलं यांचं आतून सख्य आहे. आपण अजित पवार यांच्या सोबत जाताना राजकीय भूमिका घेतली होती. आता आपण भूमीका घेतली आहे, दादा एके दादा. दादांसोबत जाण्याचा आता निर्णय घेतला आहे. मी गोंदिया नगर पालिकेचा अध्यक्ष राहिलो. माझे वडील 1952 पासून आमदार होते”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.